बेंगळूर/प्रतिनिधी
केरळ राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कर्नाटकातही रुग्ण वाढण्याची सरकारला भीती आहे. त्यामुळे सरकारने कर्नाटकात येणाऱ्या नागरिकांना कोरोना नकारात्मक अहवाल बंधनकारक केला आहे. राज्यात गुरुवारी कोरोना रुग्णसंख्येत काहीअंशी वाढ झाली. तर बरे झाल्यानंतर घरी परतणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे सक्रिय प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात १,७८५ रुग्णांची भर पडली.
दरम्यान, राज्यात गुरुवारी, १,७८५ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर १,६५१ रुग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर गुरुवारी कोरोनामुळे २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २४,४१४ वर पोहोचली आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. जिल्ह्यात मागील २४ तासात ४१४ नवीन प्रकरणे नोंदवली गेली, तर किनारपट्टी जिल्हा दक्षिण कन्नडमध्ये गुरुवारी ३३७ नवीन लोकांना संसर्ग झाला आहे.