क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युपेन येथे होणाऱया महिलांच्या मिनी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी कर्नाटकच्या पाच खेळाडूंची भारतीय फुटबॉल संघात निवड झाली असून, त्यात अंजली हिंडलगेकर, अदिती जाधव, प्रियांका कंग्राळकर या बेळगावच्या खेळाडूंना स्थान मिळाले आहे. त्याबद्दल कॅन्टोन्मेंटच्या माजी सभासदांकडून तिघींचा सत्कार करण्यात आला.
युपेन येथे 16 ते 21 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी शुक्रवारी कॅन्टोन्मेंटच्या माजी सभासदांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष साजिद शेख, डॉ. राहिला शेख, वाजीद शेख, अजिज अब्बासअली, शाबीर शेख, अराफत सुजान, सुरज रजपूत, संतोष मोला शेख, कोंडय्या आदी कॅन्टोन्मेटचे सभासद उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना साजिद शेख म्हणाले, बेळगाव शहरातून मिनी विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेत भाग घेण्यासाठी तीन खेळाडू जात आहेत, ही बेळगावसाठी भूषणावह बाब आहे. पूर्वी महिला चूल आणि मूल एवढय़ाच मर्यादेत वावरत असत. पण आता परिस्थिती बदलली असून महिलाही पुरूषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात काम करीत आहेत. टोकियोत सुरू असलेल्या ऑलिंपिकमध्येही महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. कांस्यपदक मिळविता आले नसले तरी महिला हॉकी संघाचा दर्जा उंचावला आहे. होतकरू मुली व महिलांनी खेळातील स्वारस्य वाढवावे, त्यामुळे भविष्यात नवे खेळाडू पुढे येतील.
अंजली हिंडलगेकर, अदिती जाधव, प्रियांका कंग्राळकर, विभा व संजना या कर्नाटकच्या पाच फुटबॉलपटूंना शुभेच्छा दिल्या. वरील तिन्ही खेळाडूंना युनायटेड फुटबॉल अकादमीचे प्रशिक्षक मतीन इनामदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.