निवडक देशांमध्येच होतोय वापर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वेने नॅशनल हायड्रोजन एनर्जी मिशनच्या अंतर्गत एक महत्त्वाचे पाऊल उचलत हायड्रोजन फ्यूल सेलचा वापर सुरू केला आहे. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. हरित ऊर्जेचा वापर करण्याची ही सर्वात चांगली पद्धत असून यात कार्बन डाय ऑक्साइडची शून्य निर्मिती होते. ऊर्जानिर्मितीसाठी या पद्धतीचा वापर करणारे फारच कमी देश आहेत.
काही देशांकडून परीक्षण
जर्मनीने याचा वापर करत एका रेकचे परीक्षण केले. तर पोलंडमध्येही अशाप्रकारचे परीक्षण पार पडले आहे. भारताचा याचा वापर डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) रेकमध्ये बदल करत केला जाणार आहे. या नव्या पद्धतीत ड्रायव्हिंग कंसोलमध्ये कुठलाच बदल केला जाणार नाही, यामुळे लोको पायलटला कुठल्याच अडचणीला तोंड द्यावे लागणार नाही. प्रारंभी 2 डेमू रेकना बदलाण्यात येणार आहे, त्यानंतर 2 हायब्रिड नॅरो गेज इंजिन्सला हायड्रोजन फ्यूल सेल पॉवर मूव्हमेंट आधारित सिस्टीममध्ये बदलले जाईल.
सोनिपत-जिंद मार्गाची निवड
भारतीय रेल्वेने हायड्रोजन फ्यूल सेल आधारित तंत्रज्ञानासाठी निविदा मागविल्या आहेत. हे तंत्रज्ञान उत्तर रेल्वेच्या सोनिपत-जिंद सेक्शनच्या 89 किलोमीटर अंतराच्या डेमू रेल्वेवर लागू करण्यात येईल. डिझेलद्वारे धावणाऱया डेमूला हायड्रोजन सेल तंत्रज्ञानात बदलण्यात आल्याने मोठी बचत होईल. तसेच कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन रोखण्यास मदत होणार आहे.
सर्व डिझेल इंजिन्समध्ये होणार बदल
बदल केल्यावर रेल्वे हायड्रोजन फ्यूलवर धावणार आहे. हायड्रोजन फ्यूल हे हरित ऊर्जेमध्ये सर्वोत्तम आहे. जर हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी ठरला तर डिझेलने धावणाऱया सर्व इंजिन्सना हायड्रोजन फ्यूल तंत्रज्ञानयुक्त इंजिन्समध्ये बदलले जाणार आहे. हायड्रोजन फ्यूल सेल आधारित डेमू रेकसाठी 21 सप्टेंबरपासून निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.