अपघातानंतर गाडीतील माल परस्पर लंपास
सावंतवाडी/प्रतिनिधी-
वेंगुर्ला- कामळेवीर रोडवर दारुची वाहतूक करताना स्विफ्ट गाडीला अपघात घडल्याची घटना रविवारी रात्री १०. ३० च्या सुमारास घडली. घाटीतील वळणावर ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटून अपघात झाला. अपघात होताच गाडीमधील ड्रायव्हर व त्याचा सहकारी यांनी तेथून पळ काढला. तेथून जाणा-या वाहन चालकांनी या घटनेची खबर पोलीसात दिली. या स्विफ्ट गाडीने सावंतवाडीहून जाताना दोन गाड्यांना हूल दिली होती.
एलसीबीचे पीएसआय शेळके, तसेच प्रवीण वालावलकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर झाले. परंतु मधल्यावेळेत त्या गाडी सोबत असणा-या बलेनो गाडीने अपघातग्रस्त गाडीतील सगळा माल परस्पर लंपास केला. सावंतवाडी पोलीस स्टेशनहून घटनास्थळी पोहोचलेले महेश जाधव यांनी अपघाताची नोंद केली. आज (सोमवार) संबंधित गाडी कोणाची आहे याचा तपास घेणार असल्याचे एलसीबीचे अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.