केतन पिलणकर / रत्नागिरी
‘देखीए रत्नागिरीका आम तो बडा फेमस है भाई …लेकिन इस बार आप लोक बाढ के कारण बहोत परेशान होगये है… बारीशने भी हैरान किया…’ अशा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थिबा पॅलेस रत्नागिरी येथील शेतकरी देवेंद्र झापडेकर यांच्याशी सोमवारी दुपारी 1 च्या सुमारास दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधल़ा
देवेंद्र झापडेकर यांनी ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्टचर फंडद्वारे उभारलेल्या 16 लाख रुपये किंमतीच्या आंबा पिकवणी कक्षाची माहीती यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी घेतल़ी यावेळी बॅक ऑफ इंडिया पुणे विभागाचे महाप्रबंधक एम.डी. कुलकर्णी, रत्नागिरी आंचलिक प्रबंधक केशवकुमार, उपआचंलिक प्रबंधक के. आर. कंदी, अग्रणी बँक व्यवस्थापक एन. डी. पाटील, मारुती मंदीर शाखेचे व्यवस्थापक चंदनकुमार, राजदीप धर, जिल्हा कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, संचालक आत्मा एन. टी. शिसोदे, उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, विद्याधर वैद्य आदी उपस्थित होत़े
नेमक्या प्रश्नांची सरबत्ती
यावेळी पंतप्रधान मोदींनी देवेंद्र झापडेकर यांना हापूस आंबे पिकवण्यासाठी सेंद्रीय पध्दतीने वापरता की कार्बाइडने आंबे पिकवता, हापूस आंबे खराब होण्याचे प्रमाण किती आहे, आता लोक कार्बाइडने पिकवलेली फळे खाण्यास उत्सुक नसतात तर सेंद्रीय पध्दतीने पिकवलेली फळे खाणे पसंत करतात़ याची आपल्या भागातील शेतकऱयांना कल्पना आहे का, आदी कळीचे मुद्दे असणारे प्रश्न विचारले.
लॉकडाऊनमध्ये उचलले पाऊल
देवेंद्र याच्या मनात फळे पिकवण्यासाठी आंबा पिकवणी कक्ष स्थापन करण्याचा विचार कसा आला याचीही पंतप्रधानांनी माहिती घेतली. देवेंद्र यांनी सांगितले की, टाळेबंदीमुळे हापूस आंब्याची विक्री करण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला होत़ा जिल्हा कृषी विभागाने यासाठी पुढाकार घेतला. मुंबई-पुण्यातील ग्राहकांच्या मोठय़ा गृहनिर्माण संस्थानी थेट मागणी नोंदवल़ी यामध्ये पिकलेल्या फळांची मागणी वाढल़ी मात्र त्यावेळी फळे पिकवण्यासाठी आंबा पिकवणी कक्ष नव्हत़ा. प्रारंभी इतर ठिकाणी सोय करुन ग्राहकांची मागणी पूर्ण केल़ी त्याचवेळी असा कक्ष रत्नागिरीतच सुरु करण्याचे प्रयत्नही सुरु केले. बॅक ऑफ इंडियाच्या अर्थ सहाय्याने हा कक्ष स्थापन केल़ा यावेळी मोदींनी कर्ज घेताना अडचणी आल्या का, कर्ज किती घेतले, मागणी केले तेवढेच कर्ज मिळाले का? आदी प्रश्नही विचारले.
अन्य शेतकऱयांसाठी एक उदाहरण…!
इतर शेतकऱयांसाठी तुम्ही एक उदाहरण आहात. जेव्हा एक शेतकरी स्वतःच उद्योजक बनत़ो जेव्हा शिकले-सवरलेले तरुण शेतीमध्ये उतरतात तेव्हा किती मोठा बदल घडून येतो, हे तुम्ही दाखवून दिले आहे, अशीही प्रशंसा पंतप्रधानांनी केली. तुमच्या प्रकल्पाचा माध्यमातून तुम्ही तुमच्या परिवाराचेच नव्हे तर इतर शेतकऱयांचेही भले करत आहात़, इतर शेतकऱयांच्या मनामध्ये नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा जागृत करत आहात, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. शेतकऱयांना भविष्यामध्ये पैशांची व संसाधनांची कमी भासू न देण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न असल्याचे मोदींनी यावेळी स्पष्ट केल़े
पंतप्रधानांना रत्नागिरीत येण्याचे निमंत्रण
या संवादाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये देवेंद्र यांनी पंतप्रधानांना रत्नागिरीत येण्याचे आमंत्रण दिले. आपण प्रत्यक्ष येऊन येथील शेतकऱयांना मार्गदर्शन करावे, अशी आग्रही व प्रेमळ साद त्यांनी पंतप्रधानांना घातली. यावर प्रसन्नपणे हसत नरेंद्र मोदी यांनी संवाद आवरता घेतला.
आपने माँकी इच्छा पुरी की… बहोत अच्छा किया..!
सिव्हील इंजिनियर झालेल्या देवेद्र झापडेकरांना मोदी यांनी इंजिनिअरींग व्यवसायाकडे न जाता शेतीकडे का वळलात तसेच या निर्णयामुळे आई-वडील नाराज झाले का?़, असा प्रश्न केल़ा यावर देवेद्र यांनी आईचीही आपण शेतीकडे वळावे अशी इच्छा होती, आईची कौटुबिक पार्श्वभूमीदेखील शेतीशी निगडीत व स्वतःची आवड यामुळे शेतीकडे वळल़ो, असे सांगितले. यावर पंतप्रधान मोदी यांनी खूश होत ‘तुम्ही तुमच्या आईची इच्छा पूर्ण केलीत़.. छान केलेत’ असे म्हणत देवेंद्र यांचे विशेष कौतुक केले.