विकेंड कर्फ्यूमुळे 16 रोजीही लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
मेगा लोकअदालत भरविण्याचा निर्णय कायदा सेवा प्राधिकारच्यावतीने घेण्यात आला आहे. 14 ऑगस्ट रोजी ही मेगा लोकअदालत घेण्यात येणार आहे. मात्र, त्या दिवशी कर्फ्यू असल्यामुळे काही जणांना येता आले नाही तर त्यांनी 16 ऑगस्ट रोजीसुद्धा या लोकअदालतीमध्ये भाग घेऊ शकतात. तेव्हा याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकारच्यावतीने करण्यात आले आहे.
पक्षकाराला तातडीने न्याय मिळावा यासाठी लोकअदालतीमधून खटले निकालात काढले जात आहेत. सर्वच खटले लोकअदालतीमधून निकालात काढण्यास सुरुवात केल्याने पक्षकारांना दिलासा मिळाला आहे. आता 14 ऑगस्ट रोजी मेगा लोकअदालत भरविण्यात येणार आहे. याबाबत कायदा सेवा प्राधिकारने सर्व ती तयारी केली आहे. मात्र, त्या दिवशी विकेंड कर्फ्यू असल्यामुळे काही जणांना अडचण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे 16 ऑगस्ट रोजीही लोकअदालत भरविण्याचा निर्णय घेतला.
वकिलांनी आणि पक्षकारांनी याची नोंद घ्यावी आणि तातडीने आपले खटले निकालात काढून घ्यावेत, असे कळविण्यात आले आहे. लोकअदालतमध्ये चेकबाऊन्स, कर्जवसुली, फौजदारी, कौटुंबिक, दिवाणी यासह इतर खटले निकालात काढले जात आहेत. कोरोनामुळे बहुसंख्य खटले लोकअदालतीकडे वर्ग करण्यात आले आहेत. वादी-प्रतिवादी यांच्या सहमतीने हे खटले लोकअदालतीत दाखल करून निकालात काढण्यावर आता भर देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रलंबित असलेले दिवाणी खटलेही निकालात काढण्यावर भर दिला आहे.