जम्मू काश्मीरमध्ये दोन रॉकेट लॉन्चरसह मोठा शस्त्रसाठा जप्त
स्वातंत्र्यदिनापूर्वी सुरक्षा दलाला जम्मू काश्मीरमध्ये मोठे यश मिळाले आहे. कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. तसेच दहशतवाद्यांकडून रॉकेट लॉन्चरसह मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा आढळल्याने त्यांचा घातपाताचा कट फसला आहे.
सुरक्षा दलाने खात्मा केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी पाकिस्तानी आहे. या दहशतवाद्यांकडून रॉकेट लॉन्चरसह रॉकेट आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दहशतवादी याचा वापर करत मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षा दलाने या दहशतवाद्यांचा खात्मा करत संभाव्य घातपात रोखण्यात यश मिळवले आहे.