वृत्तसंस्था/ कोची
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकलेल्या भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेशचा गुरुवारी एका अनिवासी भारतीय उद्योगपतीने जाहीर केलेले 1 कोटी रुपयाचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. म्युनिच ऑलिम्पिकमध्येही भारताने हॉकीचे कांस्यपदक मिळविले होते. त्या संघाचे गोलरक्षक मॅन्युएल प्रेडरिक यांच्या हस्ते श्रीजेशला हे बक्षीस प्रदान करण्यात आले.
येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्याचा हा गौरव करण्यात आला. संयुक्त अरब अमिरातस्थित व्हीपीएस हेल्थकेअरचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. शमशीर वायालिल यांनी श्रीजेशसाठी 1 कोटीचे बक्षीस जाहीर केले होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्रीजेशनेही त्यांचे आभार मानले आणि तुमच्यासारख्या कदरदान चाहत्यांमुळेच हॉकीपटूंना नवे मार्ग, नवा हुरुप मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी शमशीर यांनी दिलेले आणखी एक बक्षीस श्रीजेशने खुले केले, ज्यात अनुभवी हॉकीपटू मॅन्युएल यांच्यासाठी 10 लाखाचे रोख बक्षीस ठेवण्यात आले होते. शमशीर यांच्या या सरप्राईज गिफ्टचा स्वीकार करीत मॅन्युएल यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. खास श्रीजेशच्या सत्कारासाठी ते बेंगळूरहून येथे दाखल झाले होते. 1972 म्युनिच ऑलिम्पिकमध्ये हॉकीचे कांस्य भारताला मिळाले होते. या रूपाने केरळला पहिले ऑलिम्पिक पदक मिळाले होते. मॅन्युएल हे कन्नूरचे रहिवासी असून ते भारतीय संघाचे त्यावेळचे गोलरक्षक होते.
49 वर्षांनंतर केरळला दुसरे ऑलिम्पिक पदक श्रीजेशने टोकियोमध्ये मिळवून दिले. या स्पर्धेत त्याने अप्रतिम गोलरक्षणाचे प्रदर्शन केल्याने त्याला ग्रेट वॉल ऑफ इंडिया, असे संबोधले गेले. शमशीर यांच्या औदार्याची प्रशंसा करताना श्रीजेश म्हणाला की, ‘खेळावर निःस्वार्थ प्रेम करणाऱया व्यक्तीच असे निर्णय घेऊ शकतात. या कार्यक्रमास मॅन्युएल यांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान करणे, ही अतिशय अनमोल भावना आहे. या खेळाचा प्रसार आणखी वाढविण्यासाठी आमच्याकडून यापुढेही प्रयत्न होत राहतील,’ असे तो म्हणाला. शमशीरसारख्या दानशूर व्यक्ती पुढाकार घेत खेळाडूंच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतात, त्यांचे हे कार्य पाहून खूप धन्यता वाटली. केरळच्या भावी क्रीडापटूंना यामुळे आणखी प्रेरणा मिळत राहील, अशा भावना मॅन्युएल यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.