ऑनलाईन टीम / पुणे :
आयुर्वेद टिचर्स असोसिएशनतर्फे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या मान्यतेने अद्ययावत आयुर्वेद या विषयावर तिस-या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर रविवार, दिनांक १५ ऑगस्ट व सोमवार, दिनांक १६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने ही परिषद होणार आहे. यंदाचा आयुर्वेद टिचर्स असोसिएशनचा जीवनगौरव पुरस्कार पुण्याचे डॉ.विजय डोईफोडे आणि सांगलीचे डॉ.श्याम शृंगारे यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ.नितीन चांदुरकर म्हणाले, मागील वर्षीचा सन २०२० चा पुरस्कार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे माजी अधिष्ठाता डॉ. श्याम शृंगारे यांना आणि यावर्षीचा सन २०२१ चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आयुर्वेद शाखेचे माजी अधिष्ठाता डॉ.विजय डोईफोडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ.श्याम शृंगारे हे सांगलीतील वसंतदादा पाटील आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य होते. तर, डॉ.विजय डोईफोडे हे पुण्यातील राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष होते. दोन्ही पुरस्कारार्थींनी आयुर्वेदाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. परिषदेत २५० शोधप्रबंधांचे सादरीकरण आणि एमडी व पीएचडी शोधनिबंध राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली आहे.
उत्तम प्रशासक पुरस्कार सहाय्यक आयुष संचालक, पुणे डॉ. व्यंकट धर्माधिकारी आणि एमसीआयएमचे प्रबंधक डॉ.दिलीप वांगे यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच आयुर्वेद शैक्षणिक क्षेत्रामध्ये देशभरात कार्यरत प्राध्यापक, संशोधक, चिकित्सक, औषधे कंपनी यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान देखील कार्यक्रमात करण्यात येईल. सोमवार, दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सहकारनगर येथील सातव सभागृहात आमदार लहु कानडे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, युजीसीचे माजी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
डॉ.मनोज चौधरी म्हणाले, अद्ययावत आयुर्वेद या संकल्पनेवर आधारित यंदाची परिषद होणार असून आयुर्वेदाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार आहे. आयुर्वेदातील शिक्षणपद्धती, आयुर्वेदिक औषधे, पंचकर्म यांसारख्या अनेक विषयांवर भारतभरातील तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत. पुण्यासह नवी दिल्ली, आंध्रप्रदेश, वाराणसी, बडोदा, जामनगर, इंदोर, केरळ, ग्वाल्हेर, राजकोट, पंजाब येथील आयुर्वेद तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. आयुर्वेदामध्ये हजारो वैद्यकीय संकल्पना आहेत. त्यामध्ये व इतर वैद्यकीय पॅथींसोबत उपचार करण्याकरीता आयुर्वेदातील पद्धतीत अद्ययावतीकरणाच्या होण्याच्या दृष्टीने विचारमंथन होणार आहे.