वृत्तसंस्था/ कॅनबेरा
न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू 51 वर्षीय ख्रिस केर्न्स याच्यावर सिडनीमध्ये हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर केर्न्सला पक्षघाताचा (पॅरालिसीस) झटका आल्याने त्याची स्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे.
ख्रिस केर्न्सला काही दिवसांपूर्वीच हृदयामध्ये वेदना जाणवू लागल्याने त्याची डॉक्टरांनी तपासणी केली. त्या तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. या सल्ल्यानुसार चालू महिन्याच्या प्रारंभी कॅनबेरामध्ये हृदयावर शस्त्रक्रिया चालू असताना मणक्यामध्ये झटका (स्ट्रोक) आला. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीचे उपचार केले. पण त्याच्या दोन्ही पायांची हालचाल पूर्णपणे मंदावली. सिडनीतील एका हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करीत आहे. ख्रिस केर्न्सने 1989 ते 2006 क्रिकेट कारकिर्दीत 62 कसोटी, 215 वनडे आणि दोन टी-20 सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केले आहे.