वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
इतर देशांनी आपल्या राजवटीला मान्यता द्यावी, अशी तालिबानची इच्छा असली तरी अमेरिकेने तशी तयारी दर्शविण्यास नकार दिला आहे. तालिबानच्या राजवटीची दिशा निश्चित झाल्याखेरीज आणि दिलेली आश्वासने पूर्ण केल्याखेरीज त्याच्या राजवटीला मान्यता दिली जाणार नाही, असे संकेत अमेरिकेच्या नेतृत्त्वाने दिले आहे. तसेच तालिबानला विरोध करणाऱया पंजशीर खोऱयाला मान्यता देण्याच्या दिशेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. अमेरिकेने पंजशीरला मान्यता दिल्यास तालिबान विरोधी गटांना मोठेच बळ प्राप्त होण्याची शक्यता आहे.
पंजशीर क्षेत्राला तालिबानच्या हाती पडण्यापासून वाचविणे आवश्यक आहे. यासाठी अमेरिकेने या क्षेत्राला सुरक्षित क्षेत्र म्हणून ओळख द्यावी अशी मागणी अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहातील दोन सिनेटर्सनी केली आहे. अफगाणिस्तान रेजिस्टन्स फोर्स या तालिबान विरोधी आघाडीलाही अमेरिकेने पाठबळ द्यावे, अशी मागणी अमेरिकेत मोठय़ा प्रमाणात होत आहे. पंजशीरला जाण्याचा मार्ग तालिबानने अडविला असल्याचे वृत्त आहे. तसेच विरोधी नेत्यांना एकमेकांशी संपर्क करता येऊ नये यासाठी त्या भागातील मोबाईल आणि फोन जॅम करण्यात आले आहेत. तरीही विरोधी नेत्यांनी संघर्षाची तयारी चालविली आहे.
डॉक्टरांचा बहिष्कार
अफगाणिस्तानात डॉक्टर्स आणि नर्सेसनी कामावर बहिष्कार टाकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णालयात प्रवेश घेतलेल्या रुग्णांची कोंडी झाली आहे. अनेक डॉक्टर्स भूमिगत झाले असून त्यांनी देश सोडल्याची वदंता आहे. अनेक प्रांतामधील रुग्णालये उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. जी सुरू आहेत तेथे औषधे आणि सामग्रीचा खडखडाट आहे. त्यामुळे घरोघरीच्या रुग्णांना नशिबावर भरवसा टाकून दिवस कंठण्याची वेळ आली आहे, अशी माहिती आहे.
धान्य महागाई दुप्पट
अफगाणिस्तानातील अस्थिर परिस्थितीचा लाभ तेथील व्यापारी वर्ग उठवत असून जीवनावश्यक धान्यांच्या किमतीचार दिवसात दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे गरिबांवर एकभुक्त राहण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या बाटल्याही तिप्पट किंवा चौप्पट किमतीला विकल्या जात आहेत. अनेक महत्त्वाच्या औषधांचा काळाबाजार सुरू असून त्यामुळे गरिबांची अवस्था दयनीय झाली आहे.
हेल्मंडमध्ये सर्वाधिक भय
अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात सर्वाधिक हिंसाचार झाल्याने मोठय़ा प्रमाणावर लोक ठार झाले आहेत. येथे विरोधी गट आणि तालिबान यांच्यात युद्ध सुरू असल्याची स्थिती आहे. त्यामुळे या प्रांतातून हजारो लोकांनी अन्यत्र पळ काढला आहे. लष्करगाह, गेरेश्क आणि नादअली जिल्हय़ांमध्ये मुलींच्या शाळा बंद पडल्या आहेत. मुली आणि महिलांनी घरातच राहणे योग्य मानले आहे.