पशुसंगोपन खात्यामार्फत आयोजन : जिल्हय़ात 1 लाख 10 हजार ब्रुसेलोसिस प्रतिबंधक डोस उपलब्ध
प्रतिनिधी / बेळगाव
ब्रुसेलोसिस या संसर्गजन्य आजाराला आळा घालण्यासाठी पशुसंगोपन खात्याने पूर्ण तयारी केली आहे. जिल्हय़ात दि. 6 सप्टेंबरपासून ब्रुसेलोसिस प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. सांसर्गिक पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यास मानवालाही या रोगाचा प्रादुर्भाव होतो. याकरिता खबरदारी म्हणून खात्यामार्फत चार ते आठ महिन्यांच्या म्हैस व गायीच्या मादी वासरांना ही प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. संबंधित पशुपालकांनी आपल्या मादी जातीच्या वासरांना लस टोचून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन खात्याने केले आहे.
राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही लसीकरण मोहीम घरोघरी राबविण्यात येणार आहे. पशुपालकांच्या चार ते आठ महिन्यांच्या म्हैस व गायीच्या वासरांना लस दिली जाणार आहे. बुसेलोसिसने संक्रमित झालेल्या प्राण्यांशी जवळून संपर्क आल्यास मानवालाही या रोगाचा धोका आहे. हा रोग प्राणघातक नसला तरी याचा संसर्ग धोकादायक आहे. त्यामुळे पशुपालकांनी ब्रुसेलोसिस रोगापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
जिल्हय़ात 28 लाख 9 हजार 109 तर तालुक्मयात 1 लाख 78 हजार 75 इतकी जनावरांची संख्या आहे. जिल्हय़ात 1 लाख 10 हजार ब्रुसेलोसिस प्रतिबंधक डोस उपलब्ध झाले असून पहिल्या टप्प्यात 29 हजार गायी-म्हशींच्या मादी वासरांना लस दिली जाणार आहे. तर जानेवारी 2022 दरम्यान दुसऱया टप्प्यात आणि मे 2022 दरम्यान तिसऱया टप्प्यात जिल्हय़ात लस दिली जाणार आहे.
पाळीव जनावरांना ब्रुसेलोसिस रोगाची लागण झाल्यास गर्भपात होतो. याकरिता लहान वयातच त्यांना ब्रुसेलोसिस प्रतिबंधक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. इतर राज्यात ब्रुसेलोसिसची प्रकरणे समोर आली असली तरी जिल्हय़ात अद्याप एकही प्रकरण समोर आले नाही. मात्र खबरदारी म्हणून खात्याकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
पशुवैद्यांना सूचना
जिल्हय़ात 6 सप्टेंबरपासून ब्रुसेलोसिस प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. याकरिता सर्व पशुवैद्यांना खात्यामार्फत सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांना कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी फेसशील्ड, गॉगल, हातमोजे, सॅनिटायझर पुरविण्यात आले आहे.