ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पीतीमधील खमींगर ग्लेशियरवर ट्रेकिंगला गेलेल्या एका टीमचे 12 सदस्य बर्फाच्छादित भागात अडकले आहेत. तर दोघांचा थंडीने मृत्यू झाला आहे. या सदस्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा दलाने 32 जणांची टीम तयार केली आहे.
लाहौल-स्पीतीचे डीसी नीरज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 टेकर्सची टीम खंमीगार ग्लेशियरवर टेकिंगसाठी गेली होती. यातील 12 जण अद्याप वरच बर्फाच्छादित भागात अडकले आहेत. तर दोघांचा थंडीने मृत्यू झाला आहे. तर दोन जण लाहौल-स्पीतीमध्ये आहेत. दरम्यान, अडकलेल्या ट्रेकर्सना बाहेर काढण्यासाठी 32 जणांचे बचाव पथक तयार करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या ट्रेकर्सची सुटका करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर्स तिथे पोहचू शकले नाहीत. अडकलेल्या ट्रेकर्सपैकी 7 जण पश्चिम बंगालमधील ह्रदयपूर येथील माऊंटनेयरिंग फाऊंडेशनचे सदस्य आहेत. दरम्यान, येत्या 6 दिवसात हे बचावकार्य पूर्ण होईल, असेही नीरज कुमार यांनी सांगितले.