शुरा परिषदेसाठी लोकांनी पहिल्यांदाच केले मतदान
वृत्तसंस्था / दोहा
कतार या आखाती देशात शनिवारी पहिल्यांदाच राष्ट्रीय निवडणूक पार पडली आहे. कतारच्या लोकांनी पहिल्यांदाच मतदान केले आहे. कतारमध्ये या प्रकाराकडे लोकशाहीची सुरुवात म्हणून पाहिले जातेय. देशाची सल्लागार परिषद शूर कौन्सिलसाठी मतदान झाले आहे.
या आखाती देशात सल्लागार शुरा परिषदेच्या दोन तृतीयांश जागांसाठी शनिवारी पहिल्यांदाच निवडणूक घेण्यात आली. 45 सदस्यीय या परिषदेतील 30 सदस्यांची निवड करण्यासाठी मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली. तेथे मतदानासाठी महिला आणि पुरुष मतदारांसाठी वेगवेगळी व्यवस्था होती. तर उर्वरित 15 सदस्य सरकारकडून नामनिर्देशित करण्यात येणार आहेत.
234 पैकी 26 महिला उमेदवार
सरकारच्या यादीनुसार देशाच्या 30 जिल्हय़ांमध्ये निवडणुकीत उतरलेल्या 234 उमेदवारांपैकी 26 महिला आहेत. देशात अनेक वर्षांपासून नगरपालिका निवडणूक होत राहिली आहे. उमेदवारांनी निवडणूक प्रचारासाठी इंटरनेट मीडियाचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला आहे.
मतदानासाठी कायदा
कतारने जुलै महिन्यात मतदानासाठी कायदा संमत केला होता. या कायद्याच्या अंतर्गत 18 वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक मतदानात भाग घेऊ शकतात. कतारचा मूळ नागरिक असणारा किंवा आपले पूर्वज कतारमध्ये जन्मले होते हे सिद्ध करणारा व्यक्तीच मतदानात भाग घेऊ शकेल अशी अट ठेवण्यात आली होती. 1930 पूर्वी आपले पूर्वज कतारच्या क्षेत्रात राहत होते हे या लोकांना सिद्ध करावे लागणार आहे.
एक समुदाय नाराज
मतदानाच्या एका नियमामुळे कतारच्या विविध समुदायांमध्ये नाराजी आहे. विशेषकरून अल-मुर्रा समुदायाचे लोक या नियमावरून नाराज आहेत. या नियमानुसार जो व्यक्ती 1971 मध्ये कतारच्या निर्मितीनंतर देशात सातत्याने राहत नाही, तो या निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही. ऑगस्ट महिन्यात या नियमाच्या विरोधात निदर्शने देखील झाली होती. अल-मुर्रा समुदाय आणि कतारमधील राजघराण्याचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. 2017 मध्ये कतार आणि सौदी अरेबिया यांच्यात तणाव निर्माण झाला असता या समुदायाने सौदी अरेबियाला साथ दिली होती.
सर्वात मोठा वायू उत्पादक
आखाती देशांमध्ये कतारची ओळख जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायू उत्पादक देश म्हणून आहे. कतार हा जगातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणारा देश आहे. कतारमध्ये दरडोई उत्पन्न 59,000 डॉलर्स आहे. अमेरिका हा कतारचा सर्वात मोठा सहकारी आहे. कतारमध्ये पुढील वर्षी फुटबॉल विश्वचषक होणार आहे. या स्पर्धेपूर्वी स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा त्याचा प्रयत्न आहे. जगासमोर अधिक लोकशाहीवादी देश म्हणून स्वतःला सादर करण्यासाठी कतार धडपड करत आहे.