सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन 1.17 लाख कोटी – ऑगस्टच्या तुलनेत वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचा विळखा आता नियंत्रणात आल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सध्या रुळावर येत असल्याचे दिसत आहे. सलग तिसऱया महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन 1 लाख कोटींवर पोहोचल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर 2021 मध्ये जीएसटी करसंकलन 1 लाख 17 हजार 010 कोटी रुपये झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी दिली.
वस्तू आणि सेवा करसंकलनात केंद्रीय जीएसटीचा (सीजीएसटी) वाटा 20 हजार 578 कोटी आहे. तर राज्य जीएसटीचा (एसजीएसटी) वाटा 26 हजार 767 कोटी आहे. एकीकृत जीएसटी 60 हजार 911 कोटी रुपये इतके आहे. तर सेसचा वाटा 8 हजार 754 कोटी रुपये आहे. सलग तिसऱया महिन्यात जीएसटी करसंकलन 1 लाख कोटींवर गेल्याने अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे संकेत मिळत आहे. कोरोनामुळे प्रभावित झालेली अर्थव्यवस्था आता पुन्हा रुळावर येताना दिसत आहे. त्याचबरोबर सरकारचे उत्पन्नही वाढत आहे. जीएसटी संकलनात सातत्याने होणारी वाढ हे सरकार आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण आहे.
मागील सप्टेंबरच्या तुलनेत यंदा 23 टक्के वाढ
सप्टेंबर 2021 मध्ये जीएसटी संकलन 23 टक्क्यांनी वाढून मागील वषी म्हणजेच सप्टेंबर 2020 च्या तुलनेत 1 लाख 17 हजार 010 लाख कोटी रुपये झाले आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये जीएसटी संग्रहात 5,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ऑगस्टमधील 1.12 लाख कोटींच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन 1.17 लाख कोटी रुपये होते. ऑगस्ट महिन्यात 1 लाख 12 हजार 020 कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते.
ऑगस्ट-सप्टेंबरमधील तुलनात्मक संकलन
सप्टेंबरमध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) संकलन ऑगस्टच्या तुलनेत 20,522 कोटी रुपयांवरून 20,578 कोटी रुपये झाले. राज्य वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी) संकलन ऑगस्टमध्ये 26,605 कोटी रुपयांच्या तुलनेत 26,767 कोटी रुपये इतके प्राप्त झाले. याशिवाय, एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी) संकलन ऑगस्टमध्ये 56,247 कोटी रुपयांच्या तुलनेत 60,911 कोटी रुपयांवर पोहोचले. तसेच सेस 8,646 कोटी रुपयांवरून 8,754 कोटी रुपये झाला आहे.
सलग नऊ महिने 1 लाख कोटी रुपयांच्या वर राहिल्यानंतर जून 2021 मध्ये जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आले. यानंतर, जुलैमध्ये, जीएसटी संकलन पुन्हा 1 लाख कोटींच्या वर पोहोचले. आता सलग 3 महिने जीएसटी संकलन 1 लाख कोटी रुपयांच्या वर आहे.