वेदांता महिला लीग फुटबॉल स्पर्धा; शिरवडेच्या तितली सरकारचे डबल हॅट्ट्रिकसह सात गोल
क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या जीएफए – वेदांता महिला फुटबॉल लीग स्पर्धेतील सलामीच्या दिवशी एफसी गोवा आणि विजय नोंदविले. काल नावेलीतील रोझरी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात एफसी गोवाने युनायटेड क्लब ऑफ तळावली संघाचा 3-1 गोलानी पराभव केला.
एफसी गोवा संघाची कप्तान वायलांका डिसोझाने गोल करून संघाचे खाते उघडले तर नंतर भारताची आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू वॅलनी फर्नांडिसने दोन गोल केले. पहिल्या सत्रात एफसी गोवाच्या आलिशा तावारीस, अर्पिता पेडणेकर आणि वॅलनी फर्नांडिसचे गोल करण्याचे यत्न हुकले. सामन्याच्या 40व्या मिनिटाला यूसी तळावलीच्या स्ट्रायकरचा गोल करण्याचा यत्न एफसी गोवाची गोलरक्षक जॉसलीन डिसोझाने उधळून लावला.ं
सामन्याचे दुसरे सत्र एफसी गोवाचे राहिले व यात त्यांनी तीन गोल केले. प्रथम 52व्या मिनिटाला वालांका डिसोझाने गोल करून आघाडी घेतली. त्यानंतर 69व्या व 75व्या मिनिटाला वॅलनी फर्नांडिसने लागोपाठ दोन गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
धर्मापूर मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात गतवर्षीय विजेत्या शिरवडे स्पोर्ट्स क्लबने एकतर्फी विजयाची नोंद करताना कंपेशन एफसी संघाचा 10-0 गोलानी फडशा पाडला. शिरवडे स्पोर्ट्स क्लबच्या विजयात त्यांची आऊटस्टेशन फुटबॉलपटू तितली सरकारने मोलाचा वाटा उचलताना डबल हॅट्ट्रिकसह सात गोल केले. या व्यतिरिक्त विनॉश्का फर्नांडिसने दोन तर रविनाने एक गोल केला.
स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यांना एफसी गोवाचे तांत्रिक संचालक डॅरीक परेरा, गोवा फुटबॉल संघटनेचे दक्षिण गोवा उपाध्यक्ष अँथनी पांगो, जीएफएच्या महिला फुटबॉल समितीच्या चेअरमन कॅरल गोम्स, सेझा फुटबॉल अकादमीचे प्रमुख मॅल्रॉय मौरा तसेच जीएफए महिला फुटबॉल समितीचे उपाध्यक्ष आर्नोल्ड कॉस्ता उपस्थित होते.