कोटा / वृत्तसंस्था
काही दिवसांपूर्वी एका दलित युवकाला जमावाने मारहाण करुन त्याचा जीव घेतल्याची घटना घडल्यानंतर आता राजस्थानात एका आदिवासी मुलीवर वारंवार बलात्कार करुन तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. राजस्थानातील झलवार जिल्हय़ातील मंदावर येथे हा प्रकार घडला.
याप्रकरणी दाऊद नामक आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात बलात्कार, बेकायदेशीर गर्भपात घडविणे, भ्रूणहत्या इत्यादी अनुच्छेदांखाली गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली. पाठोपाठ घडलेल्या या दोन प्रकरणांमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. राज्यातील कायदा-सुव्यस्थेचे तीन तेरा वाजले असून सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित नाही, असा आरोप भाजपने केला.
राहुल गांधी येथे का नाहीत?
लखीमपूर खेरी येथे मृत झालेल्या शेतकऱयांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांची गळाभेट घेणारे राहुल गांधी काँगेसचे राज्य असणाऱया राजस्थानात दलितांवर आणि आदिवासींवर होणाऱया अत्याचारासंदर्भात मूग गिळून गप्प आहेत. जमावाने मारलेल्या दलित युवकाच्या कुटुंबियांना आणि बलात्कारीत आदिवासी मुलीच्या कुटुंबियांना भेटण्याची त्यांची तयारी नाही. कारण ते राजकीय दृष्टय़ा त्यांच्या सोयीचे नाही, असा टोमणा भाजपच्या प्रवक्त्याने मारला आहे.