प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कडून यंदा म्हैस व गाय दूध दरफरकापोटी 83 कोटी 81 लाख 50 हजार रुपये देणार आहे. गतवर्षी पेक्षा 8 कोटींनी वाढ झाली आहे. गुरुवारापासून प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असून दूध उत्पादाकांच्या हातात दिवाळीपूर्वी पैसे मिळणार आहेत. अशी माहीती चेअरमन विश्वास पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
विश्वास पाटील म्हणाले, संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस दूध दरफरक दिला जातो. त्याप्रमाणे यावर्षी देण्यात येत आहे. गत वर्षी महापूरामुळे शेतकरी अडचणीत आलेला होता. तसेच कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सर्व उद्योगधंदे व शेतीपूरक व्यवसाय अडचणीत असताना गोकुळ दूध संघाने खर्चात काटकसर करुन वर्षभर राज्यातील इतर संघांच्या तुलनेत जास्त दूध दर दिलेला आहे.गोकुळने दूध उत्पादकांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध योजना व विकास प्रकल्प राबविलेले आहेत. दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांचे मार्गदर्शन व सभासद दूध संस्था तसेच दूध उत्पादक यांच्या सहकार्यामुळे गोकुळची यशस्वी वाटचाल सुरू ठेवू शकलो आहोत. याहीपुढे ती आम्ही चालू ठेवू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे, बयाजी शेळके, अभिजीत तायशेटे, एस. आर. पाटील, बाबासाहेब चौगले, अजित नरके, किसन चौगले, शशीकांत पाटील, अमर पाटील, नंदकुमार ढेंगे आदी उपस्थित होते.
असा मिळणार दूध फरक
म्हैस 49 कोटी 53 लाख 2 हजार
गाय 21 कोटी 50 लाख 18 हजार
व्याज 2 कोटी 86 लाख 74 हजार (6 टक्के )
डिबेंचर्स 4 कोटी 57 लाख 89 हजार (6.5 टक्के)
शेअर डिव्हीडंड 5 कोटी 33 लाख 65 हजार (11 टक्के)
एकूण 83 कोटी 81 लाख 50 हजार
म्हैस खरेदीला चांगला प्रतिसाद
जिल्हा बँकेच्या सहकार्यातून सुरु असलेल्या म्हैस खरेदी योजनेस चांगला प्रतिसाद आहे, आण्णासाहेब पाटील महामंडळाकडून व्याज मिळणार असल्याने शेतकरी म्हैस खरेदीसाठी पुढे येत आहेत असे विश्वास पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर 2250 रुपयांच्या विमा हप्त्यातील 20 टक्के रक्कम संघाकडून दिली जाणार आहे. म्हैस दगावल्यास एक लाख भाकड झाल्यास 50 हजार मिळणार आहेत. जास्ती जास्त शेतकऱयांना या योजनेत सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी तालुकानिहाय मेळावे सुरु आहेत. असे पाटील यांनी सांगितले.