दिला होता आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी /सातारा
सातारा शहरातील रस्ते पावसामुळे व इतर कामामुळे खराब झाले होते. ते खड्डे बुजवण्यात यावेत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नगरसेवक धनंजय जांभळे यांनी दिला होता. त्यानुसार सातारा पालिकेच्या बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले असून ते काम त्यांनी स्वतः उभे राहून काम करवून घेतले.
त्यांनी पालिकेकडे दिलेल्या निवेदनानुसार राजवाडा ते बोगदा देवज्ञ मंगल कार्यालय ते फुटका तलाव, मिरेकर चौक, टोपे मामा दत्तमंदिर, अदालतवाडा ते नगरपालिका मुख्यालय येथील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. याच रस्त्यातून विविध कामांसाठी पूर्ण परळी भाग ठोसेघर, सज्जनगड, सांबरवाडी, यवतेश्वर, कास, बामणोली अशी रोज लोकांची येजा करत असतात. या रस्त्यावर रहदारी असते. लोकांच्यात पालिकेच्या कामकाजाविषयी अतिशय तीव्र नाराजी आहे. तरी डांबर, पॅचिंग करुन तात्पुरत्या स्वरुपात लवकरात लवकर जेणेकरुन आठ दिवसात न केल्यास वेगवेगळय़ा प्रकारची आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दि. 29 सप्टेंबर रोजी दिला होता. त्यानुसार पालिकेने हे काम हाती घेतले असून ते काम नगरसेवक धनंजय जांभळे हे स्वतः उभे राहून करुन घेत आहेत.