ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन पोलीस आणि एक जवान जखमी झाला असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील भाता दुरियान वनक्षेत्रात शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलांचे पथक दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाजवळ पोहोचले तेव्हा दहशतवाद्यांनी पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकावर गोळीबार केला. ज्यात दोन पोलीस आणि एक लष्करी जवान जखमी झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी झिया मुस्तफाही जखमी झाल्याचे सांगण्यात येते.