वृत्तसंस्था / श्रीनगर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जम्मू-काश्मीरच्या दौऱयावर असताना खोऱयात मोठय़ा संख्येत सुरक्षा दलाला तैनात करण्यात आले होते. तरीही रविवारी दहशतवाद्यांनी शोपियांच्या जैनापोरामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला आहे. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल सीआरपीएफच्या पथकाने कारवाई केली होती. क्रॉस-फायरमध्ये एका काश्मिरी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. फळविक्रेते शाहिद एजाज असे मृत नागरिकाचे नाव आहे.
मागील एक महिन्यात काश्मीर खोऱयात 11 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे जम्मू-काश्मीर पोलीस आणि सैन्याने दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिमेला वेग दिला आहे. मृत्युमुखी पडलेल्या 11 नागरिकांपैकी 5 जण बिहारचे होते. तर उर्वरित 3 जण काश्मीरमधील अल्पसंख्याक समुदायाचे होते. तसेच मृतांमध्ये दोन शिक्षकांचा समावेश होता.
जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्हय़ात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान गोळीबारात दोन पोलीस कर्मचारी आणि एक सैनिक जखमी झाला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील एक दहशतवादी कैदेत होता. तो या गोळीबारात जखमी झाला होता, त्याचाही मृत्यू ओढवल्याचे समजते.
पुंछमध्ये 14 दिवसांपासून सैन्याची मोहीम सुरू आहे. रविवारी सकाळी येथील जंगलांमध्ये सैन्य आणि पोलिसांच्या एका संयुक्त शोधपथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. तेव्हापासून तेथे चकमक सुरू आहे.