तिघे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद
कोल्हापूर/प्रतिनिधी
सुभाष नगर येथील बंद बंगल्याचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी 10 तोळ्यांचे दागिने आणि रोकड लंपास केली. तिघा चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याचे परिसरातील सीसीटीव्ही फूटेज वरून उघडकीस आले आहे. महापालिकेचे निवृत्त अधिकारी दिलीप शंकर जानवेकर यांचा हा बंगला आहे. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. केवळ दोन तासात चोरट्यांनी 5 लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला.
या बाबत अधिक माहिती अशी की, सुभाष नगर येथील सिरतमोहल्ला येथे महापालिकेचे निवृत्त अधिकारी दिलीप शंकर जानवेकर यांचा बंगला आहे. त्यांचा मुलगा सावंतवाडी येथे न्यायालयात लिपीक पदावर कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून जानवेकर कुटूंब सावंतवाडी येथे मुलाकडे राहतात. दिलीप जानवेकर हे निवृत्त झाल्यानंतर कुटुंबीयांसमवेत सावंतवाडी येथील मुलाकडे वास्तव्यास आहेत. दिवाळी निमित्त जानवेकर कुटुंब नुकतेच कोल्हापूरला परतले आहेत. आज (शुक्रवार) पहाटे जानवेकर मॉर्निंग वाकसाठी घरातून बाहेर पडले होते, तर त्यांचे अन्य कुटुंबीय बंगल्यात दुसऱ्या मजल्यावर झोपले होते. जाताना त्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावले. पहाटे सहा वाजता बाहेरुन फिरुन आलेनंतर बंगल्याच्या लोखंडी दरवाजा उघडा दिसला. मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी मुलगा, पत्नी, सुन यांना हाक मारुन खाली बोलवून घेतले. त्यानंतर घरातील तिजोरी, किचन रुममधील साहित्य विस्कटलेले दिसून आले. तिजोरीतील दहा तोळे सोन्याचे दागिने व रोकड गायब असलेची दिसून आली. जानवेकर कुटूंबियांनी तात्काळ या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांनी दिली. गुन्हे शोध पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.श्वानाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते परिसरातचं घुटमळले.