विशेष शाळांना मिळाला आर्थिक आधार, ग्राहकांचा प्रतिसाद ः विशेष मुलांच्या कल्पनेला हवे समाजाचे पाठबळ
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापुरातील चेतना अपंगमती विकास संस्था व स्वयंम विशेष मुलांची शाळा या संस्थांनी यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी भेटवस्तू बॉक्स, आकाशदिवे व दिवाळीला लागणारे साहित्य बनवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही संस्थांच्या मुलांनी घरातून हे साहित्य बनवले आहे. या संस्था या वस्तू विक्रीतून मुलांच्या पालन पोषणाचा खर्च भागवतत. या वस्तू विकत घेऊन प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे.
इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित स्वयंम विशेष मुलाच्या शाळेतील मुलांनी दिवाळीसाठी आवश्यक असणारे साहित्य घरी राहून बनवले. स्वपम उद्योग केंद्रातर्फे तीन प्रकारचे दिवाळी भेटवस्तू बॉक्स तयार केले. यामध्ये उटणं पाकीट दोन, आयुवैदिक साबण, तेल, मातीच्या पणत्या, एमडीएफ आकाशदिवा,धूप घर आदी वस्तुचा समावेश आहे. या बॉक्सची किंमत 200 व 250 रुपये आहेत. दीड हजाराहून अधिक बॉक्सची विक्री झाली आहे. पालकांच्या मदतीने या वस्तू बनवण्यात आल्या,अडचण आल्यास व्हिडीओ कॉल, व्हॉटसअपद्वारे शंकांचे निरसन करण्यात आले. गतवर्षी कोरोनामुळे 500 बॉक्सचीच विक्री झाली होती.यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती मुख्याध्यापक प्रमोद भिसे यांनी दिली. यातून मिळालेल्या पैशातून विद्यार्थ्यांच्यावर खर्च केला जातो.
चेतनातर्फे विद्यार्थ्यांना विद्यावेतन
शेंडा पार्क येथील चेतना विकास मंदिरतर्फे दरवर्षी भेटवस्तू बॉक्सची विक्री केली जाते. या बॉक्समध्ये पणती बॉक्स, उटणं, साबण, ऑक्सी सेंट याचा समावेश आहे.मुलांनी घरी राहून हॅण्डमेड व पारंपरिक आकाशकंदील, पणत्या, पूजन पुढे,उटणं या वस्तू बनवल्या. या बॉक्सची किमत 275 रुपये आहे. संस्थतर्फे ना नफा ना तोटा या तत्वावर हा उपक्रम राबवला जातो. शाळेतील दोनश मुलांपैकी 100 मुलांनी सहभाग नोंदविला.संस्थेतर्फे आतापर्यंत पारंपरिक व हॅण्डमेड 250 हून अधिक आकाशदिवे, छोटे आकाशदिवे 250 डझन, षटकोनी आकाशदिवे 30 डझन, 30 ते 40 हजारांच्या आसपास पणत्यांची विक्री झाली आहे.या मुलांना प्रोत्सहनपर विद्यावेतनसुद्धा दिले जाते, आशी माहिती चेतना प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापीकीय अधीक्षक कृष्णात चौगले यांनी दिली.
संस्था कर्मचारी, पालकांचे सहकार्य
दिवाळी साहित्य बनवण्यासाठी चेतना व स्वयंम संस्थने पालक व मुलांना प्रशिक्षण दिले. व्हीडीओ,मोबाईलद्वारे मुलांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. दिवाळीचे साहित्य बनवण्यासाठी मुलांच्या जोडीला पालकांनीही आपले योगदान दिले. संस्थेतील कर्मचाऱयांनी यात योगदान दिले.