पुढील तीन दिवस वादळी वाऱयासह बरसणार : सांखळीत सर्वाधिक दीड इंच पाऊस
प्रतिनिधी /पणजी
आणखी तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऐन दिवाळी उत्सवावर पाऊस जोरदार बरसला. बुधवारी रात्री संपूर्ण गोव्यात पावसाने थैमान घातले आणि दिवाळी उत्सवावर व उत्साहावर विरजण घातले. तर ऐन दिवाळी दिनी गुरुवारी राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. गुरुवारी रात्री सर्वाधिक दीड इंच पाऊस सांखळीत पडल्याची नोंद आहे.
पावसाळा संपुष्टात आल्यानंतरच्या नव्याने आलेल्या पावसाने गोव्यात ऐन दिवाळीलाच सर्वत्र धुमाकूळ घातला. बुधवारी रात्री दिवाळीच्या पूर्वसंध्येला राज्याला पावसाने झोडपून काढले. बुधवारी सर्वाधिक दीड इंच पाऊस हा सांखळीत झाला. पेडणे येथे 3 से.मी. एवढा पाऊस झाला. म्हापसा येथे अर्धा इंच, पणजीत 1 से.मी. पेक्षाही कमी पाऊस पडला. वाळपईत अर्धा इंच, काणकोणमध्ये पाउण इंच व सांगे येथे 1 से.मी. एवढी पावसाची नोंद झाली.
आगामी 24 तासांत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दि. 7 नोव्हेंबरपर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस पडणार व त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. दि. 11 नोव्हेंबरनंतर गोव्यात पाऊस राहणार नाही असे हवामान खात्याने म्हटले आहे. ऐन दिवाळी दिवशी गुरुवारी फोंडा व आसपासच्या परिसराला पावसाने झोडपून काढले. सांखळीमध्ये देखील जोरदार पाऊस व विजांचा गडगडाट झाला.
पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याने तसेच कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात निर्माण झाल्याने जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर समुद्र खवळलेला राहील. परिणामी मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मान्सूनोत्तर पावसाच्या प्रमाणात गोव्यात वाढ झाली असून उत्तर गोव्यात आतापर्यंत 270.7 मि.मी. तर दक्षिण गोव्यात 215.6 मि.मी. पाऊस झालेला आहे. उत्तर गोव्यात 135.5 मि.मी. म्हणजे 5 इंच पाऊस अतिरिक्त पडलेला आहे तर दक्षिण गोव्यात 3.5 इंच पाऊस अतिरिक्त झाला आहे. पुढील 4 दिवस राज्यात पाऊस पडणार आहे. ऐन दिवाळी उत्सवात पावसाने थैमान घातले आणि दिवाळी उत्सावातील उत्साहावर मात्र पाणीच पडले.