वृत्तसंस्था / साओ पावलो
2022 साली कतारमध्ये होणाऱया फिफाच्या पुरुषांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी ब्राझीलचा संघ पात्र ठरला आहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा ब्राझील हा पहिला दक्षिण अमेरिकन संघ आहे. पात्र फेरीच्या स्पर्धेत झालेल्या सामन्यात ब्राझीलने कोलंबियाचा 1-0 अशा गोल फरकाने पराभव करत कतार स्पर्धेचे तिकीट निश्चित केले.
कतारमधील विश्व करंडक स्पर्धेसाठी पात्रतेच्या फुटबॉल स्पर्धा विविध ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत. दक्षिण अमेरिकन विभागातून या स्पर्धेसाठी ब्राझीलने सर्वप्रथम आपली पात्रता सिद्ध केली आहे. दक्षिण अमेरिकन विभागातून सुरु असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेत ब्राझीलने 12 पैकी 11 सामने जिंकून आघाडीचे स्थान मिळविले. गुरुवारी रात्री येथे झालेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेतील सामन्यात ब्राझीलने कोलंबियावर 1-0 अशा गोल फरकाने निसटता विजय मिळविला. या सामन्यात 72 व्या मिनिटाला ब्राझील संघातील लुकास पेक्वेटाने एकमेव निर्णायक गोल नोंदविला. दक्षिण अमेरिकन विभागातून पहिले चार संघ कतारमधील विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील.
ब्राझील संघाला टेटेचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझील संघाने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये 50 सामने जिंकले असून 5 सामने गमावले तर 12 सामने अनिर्णीत राखले आहेत. 2018 साली ब्राझील संघाच्या प्रमुख प्रशिक्षिकपदी टेटे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
दक्षिण अमेरिकन विभागातून ब्राझीलचा संघ चिलीपेक्षा 18 गुणांनी आघाडीवर आहे. चिली संघाचे या पात्र फेरीच्या स्पर्धेतील 5 सामने बाकी असून ते या सामन्यातून 15 गुण मिळवू शकतील. ब्राझीलने या गटात 12 पैकी 11 सामने जिंकत पहिले स्थान पटकाविले आहे. अर्जेंटिना या गटातून दुसऱया स्थानावर आहे. इक्वेडोर 20 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. चिली, कोलंबिया आणि उरुग्वे यांनी समान प्रत्येकी 16 गुण नोंदविले आहेत. गुरुवारी झालेल्या अन्य एका पात्र फेरीच्या सामन्यात इक्वेडोरने व्हेनेझुएलाचा 1-0 असा पराभव केला. या सामन्यातील एकमेव गोल हिनकॅपीने केला. त्याचप्रमाणे चिलीने पराग्वेवर 1-0 अशी मात केली. चिलीतर्फे एकमेव गोल अँटोनी सिल्वाने केला.