वृत्तसंस्था / ख्राईस्टचर्च
2022 साली न्यूझीलंडमध्ये होणाऱया आयसीसीच्या महिलांच्या विश्व करंडक
क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी भारत-न्यूझीलंड महिला क्रिकेट संघामध्ये टी-20 आणि वनडे मालिका खेळविली जाणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ या दौऱयात 5 वनडे आणि एकमेव टी-20 सामन्यांची मालिका खेळेल.
तब्बल 22 वर्षांनंतर न्यूझीलंडला आयसीसी महिलांच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी लाभली आहे. कोरोना महामारी समस्येमुळे आयसीसीची महिलांची विश्व चषक क्रिकेट स्पर्धा यापूर्वी एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद न्यूझीलंडच्या पुरुष संघाने गेल्या जुलै महिन्यात पटकाविताना अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. न्यूझीलंडच्या पुरुष क्रिकेट संघाने आतापर्यंत कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये मायभूमीत किंवा इतर ठिकाणी एकदाही दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलेले नाही. पुढील वर्षीच्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ न्यूझीलंडच्या दौऱयावर येणार आहे. या दौऱयामध्ये उभय संघात दोन कसोटी सामने खेळविले जाणार आहेत.
न्यूझीलंडच्या पुरुषांचा क्रिकेट संघ भारतामध्ये मालिका खेळण्यासाठी येणार असून त्यांचा भारतातील मुक्काम पुढील महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत राहील. मायदेशी परतण्यापूर्वी या संघातील खेळाडूंना काही दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये रहावे लागेल. नव्या वर्षांच्या प्रारंभी बांगलादेशचा संघ न्यूझीलंडचा दौरा करणार असून या दौऱयात उभय संघात दोन कसोटी सामने खेळविले जाणार आहेत. दक्षिण आप्रिका आणि बांगलादेशबरोबर न्यूझीलंडचे हे कसोटी सामने आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीपअंतर्गत राहतील. न्यूझीलंड संघाचा 2022 चा क्रिकेट हंगाम भरगच्च आहे. पुढील वर्षीच्या न्यूझीलंडच्या क्रिकेट हंगामात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका प्रमुख आकर्षण असेल. उभय संघामध्ये 3 वनडे आणि टी-20 सामने येत्या जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले गेले आहेत. मार्चअखेरीस हॉलंडचा संघ न्यूझीलंडमध्ये मालिका खेळण्यासाठी दाखल होणार आहे. हॉलंड आणि न्यूझीलंड यांच्यात 3 वनडे आणि टी-20 सामने खेळविले जाणार आहेत.