वृत्त संस्था/ गॉडेलाजेरा (मेक्सिको)
येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनची टेनिसपटू गॅरबिन मुगुरूझाने द्वितीय मानांकित क्रेजिकोव्हाचा पराभव करत उपांत्य फेरीसाठीचे आपले आव्हान जिवंत ठेवले. इस्टोनियाच्या कोंटाव्हेटने झेक प्रजासत्ताकच्या प्लिस्कोव्हाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पेनच्या पाचव्या मानांकित मुगुरूझाने शुक्रवारी द्वितीय मानांकित बार्बोरा क्रेजिकोव्हाचा 2-6, 6-3, 6-4 अशा सेटस्मध्ये पराभव केला. या विजयामुळे मुगुरूझाने आपल्या गटातून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्याचे आव्हान जिवंत ठेवले. शुक्रवारी या स्पर्धेतील झालेल्या दुसऱया एका सामन्यात ऍनेटी कोंटाव्हेटने झेक प्रजासत्ताकच्या प्लिस्कोव्हाचा 6-4, 6-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. इस्टोनियाच्या कोंटाव्हेंटचा हा सलग 12 वा विजय आहे. पहिल्यांदाच डब्ल्यूटीए टूरवरील या अंतिम स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारी कोंटाव्हेट ही पहिली टेनिसपटू आहे. तिने प्लिस्कोव्हाचा 57 मिनिटात पराभव केला. या स्पर्धेतील तिचा हा दुसरा विजय आहे.