वार्ताहर / कुंभोज
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील कुंभोज – बाहुबली रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील नूतन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळील लक्ष्मण आण्णा पांडव यांच्या बंद घरावर वॉच ठेवून शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करुन तिजोरी फोडून रोख रक्कम व चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारल्याची घटना रविवारी उघडकीस आली. यावेळी घटनास्थळी पोलिस पाटील महम्मद पठाण यांनी भेट देऊन पाहणी केली.
लक्ष्मण पांडव हे नोकरीनिमित्त पुणे येथे राहतात. त्यामुळे चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास घरात कोणी राहत नाही याची खातर जमा करून गेटला कुलूप लावले होते पण चोरट्यांनी भिंतीवरुन उडी मारुन बंद घराचे कडी कोयंडा तोडून तिजोरी उचकटून चोरीचा प्रयत्न केला. त्यामध्ये चोरट्यांने रोख रक्कम व चांदीच्या वस्तूं लंपास केल्या. यावेळी चोरट्यांनी बेड, तिजोरीतील साहित्य विस्कटून टाकले होते.
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील कुंभोज – हातकणंगले रोडवरील श्री गणेश सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या शेजारी असलेल्या ॲड.अमर घोरपडे यांच्या गोठ्यात बांधलेली देशी गाय चोरुन नेल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. कुंभोज – हातकणंगले रोडवरील ॲड.अमर घोरपडे यांचा राहत्या घराजवळ जनावरांचा गोठा आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातील एक देशी गाय चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गेल्या वर्षभरात कुंभोज येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढतच होत आहेत. त्यामुळे या परिसरात चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट व भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे हातकणंगले पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.