प्रतिनिधी / कोल्हापूर
निवडणूकीमध्ये जेष्ठ पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. हे आश्वासन न पाळता पेन्शनधारकांची फसवणूक केली आहे. याच्या निषेधार्थ सर्व श्रमिक संघाच्यावतीने मंगळवारी भाजप कार्यांलयाला कूलूप घालण्यात येणार होते. पण पोलिसांकडून कायदा सुव्यवस्थेचे कारण देऊन हे आंदोलन रोखण्यात आले. भाजप कार्यालयाला टाळे लावण्यासाठी कुरियरने कुलूप पाठवण्यात आले असून, येत्या दोन महीन्यानंतर भाजप कार्यालयाला कुलूप लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
निवडणूकीमध्ये पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढ देण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. पण हा शब्द न पाळल्याने, मंगळवारी बिंदू चौक येथील भाजप कार्यालयाला कुलूप लावण्यात येणार होते. यासाठी श्रमिक कार्यालयामध्ये एसटी संप असून देखील सुमारे 300 पेन्शनधारक हजर झाले होते. पण पोलिसांनी या पेन्शनधारकांना श्रमिक कार्यालयासमोर रोखण्यात आले. यामुळे मंगळवारचे कुलूप घाला आंदोलन दोन महिन्यानंतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एसटी बंद असून देखील कोल्हापूर, सांगली व सातारा येथील पेन्शनधारकासह अतुल दिघे, अनंत कुलकर्णी, धोंडीबा कुंभार, गोपाळ पाटील, शांताराम पाटील आदी उपस्थित होते.