पादचाऱयांना बसतोय फटका : महानगरपालिकेचे दुर्लक्ष, दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी लावण्यात आलेले डेकोरेटिव्ह लाईट आता देखभालीअभावी अडचणीचे ठरत आहेत. रेल्वेओव्हरब्रिजपासून ते उद्यमबागपर्यंत अनेक लाईट बंद तर अनेक खांब कोसळले आहेत. महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने या लाईटमुळे अपघातही घडत आहेत. त्यामुळे एकतर यांची दुरुस्ती करावी अन्यथा ते काढून टाकावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. काही वर्षांपूर्वी शहराच्या विविध भागात डेकोरेटिव्ह लाईट बसविण्यात आले होते. विविध रंगांचे हे लाईट शहराच्या सौंदर्यात भर पाडत होते. रेल्वे ओव्हरब्रिजपासून उद्यमबागपर्यंत तर येडियुराप्पा मार्गावरही अशा प्रकारचे लाईट बसविण्यात आले होते. परंतु योग्य प्रकारे त्यांची देखभाल करण्यात आलेली नाही. यातील अनेक लाईट सद्यस्थितीत बंद आहेत. तर अनेक मोडकळीला आले आहेत. फूटपाथवर लाईट मोडून पडले असल्याने येणाजाणाऱया लोकांनाही याची अडचण होत आहे. त्यामुळे या लाईटची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.