पत्नी अन् 2 मुलांची केली हत्या – आरोपी डॉक्टरचा थांगपत्ता नाही
वृत्तसंस्था/ कानपूर
कोरोनामुळे आलेले नैराश्य आणि ओमिक्रॉनच्या दहशतीमुळे उत्तरप्रदेशातील एका डॉक्टरने स्वतःच्या पूर्ण कुटुंबाचीच हत्या केली. कानपूरचे डॉ. सुशील कुमार यांनी शुक्रवारी संध्याकाळी स्वतःची पत्नी, मुलगा आणि मुलीची हत्या केली. कुटुंबाच्या हत्येनंतर डॉक्टरने एक पत्र लिहिले असून यात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन आल्यावर आता आणखीन मृतदेह मोजायचे नाहीत, तो सर्वांना मारून टाकेल असे नमूद केले आहे. कोरोनाशी संबंधित नैराश्य आल्याचेही डॉक्टरने लिहिले आहे.
डॉक्टरने सर्वप्रथम शुक्रवारी संध्याकाळी 5.32 वाजता स्वतःच्या भावाला मेसेज पाठवून पोलिसांना आपण हत्या केल्याचे कळविण्यास सांगितले होते. डॉ. सुशील मागील काही काळापासून नैराश्यात होते. हत्येनंतर ते कुठे गेले हे कुणालाच माहित नसल्याने पोलिसांनी त्याचा शोध चालविला आहे.
आणखीन मृतदेह मोजायचे नाहीत
“हा कोविड ओमिक्रॉन आता सर्वांना मारून टाकेल, आता आणखीन मृतदेह मोजायचे नाहीत. स्वतःच्या निष्काळजीपणामुळे करियरच्या अशा टप्प्यावर पोहोचलो आहे, ज्यातून बाहेर पडणे अशक्य आहे. माझे कुठलेच भविष्य नाही. मी पूर्ण शुद्धीत स्वतःच्या कुटुंबाला संपवत आहे. मी उपचार नसलेल्या आजाराने ग्रस्त झालोय’’ असे डॉक्टरने पत्रात नमूद केले होते.