कळंगुटमध्ये महिला कौशल्य विकास शिबिराचे उद्घाटन
प्रतिनिधी /पणजी
दिल्लीच्या आमदार तथा आम आदमी पार्टीच्या गोवा प्रभारी आतिशी यांनी राज्यातील प्रत्येक महिलेच्या खात्यात 1000 रुपये जमा करण्याच्या आप च्या प्रस्तावित योजनेसाठी शुक्रवारी पणजीत नोंदणी मोहिमेची औपचारिक सुरुवात केली.
त्यानंतर त्यांनी आप नेते सुदेश मयेकर, उपाध्यक्ष व्हेंझी व्हिएगश, जिल्हा पंचायत सदस्य हॅन्झेल फर्नांडिस यांच्यासह कळंगुट व बाणवली येथून मोहीम प्रारंभ केली. स्त्रिया घर चालवतात आणि कुटुंबाची काळजी घेतात, तरीही त्या पुरुषांवर अवलंबून असतात. कितीही लहान-मोठा निर्णय असो, तो सहसा घरातील पुरुषच घेतात. महिलांसाठी 1000 योजना ही महिलांना आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र करण्यासाठी आहे अस आतिशी म्हणाल्या.
आप’ची ही ’पाचवी हमी’ म्हणजे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा आणि प्रभावी महिला सक्षमीकरण कार्यक्रम असेल. महिलांच्या स्वतःच्या छोटय़ा छोटय़ा इच्छा आणि आकांक्षा असतात पण त्या आर्थिकदृष्टय़ा त्यांचे वडील, पती आणि भाऊ यांच्यावर अवलंबून असतात. ’आप’ची सत्ता आल्यास गोव्यातील प्रत्येक महिला आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनेल,’’ असे त्या पुढे म्हणाल्या.
स्थानिक महिलांना स्वावलंबी व सक्षम बनण्यास मदत करण्याच्या उद्देशाने, आतिशी यांनी शुक्रवारी कळंगुट मतदारसंघातील महिलांसाठी ’महिला कौशल्य विकास शिबिर’ सुरू केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी, ज्ञान आणि कौशल्याने स्वतःला सुसज्ज करण्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतला आहे, असे मयेकर यांनी सांगितले.
बाणावलीसाठी शैक्षणिक जाहीरनामा
दरम्यान, आतिशी यांनी शुक्रवारी कॅप्टन वेंझी व्हिएगश आणि सरचिटणीस हॅन्झेल फर्नांडिस यांच्यासमवेत बाणावली मतदारसंघासाठी शैक्षणिक घोषणापत्र तयार करण्यासाठी आपचे ’शिक्षक पॅनेल’ सुरु केले.
आतिशी यांनी दावा केला की, राज्यात प्रथमच एका राजकीय पक्षाने मतदारसंघातील शिक्षण सुधारणा जाहीरनामा तयार करण्यासाठी एक संस्था तयार केली आहे. शिक्षण ही भावी पिढीची गुरुकिल्ली आहे. परंतु विद्यमान व माजी आमदारांनी त्यासाठी पुढाकारच न घेतल्याने आज विद्यार्थी व शिक्षकांचा विकास खुंटला आहे, असा आरोप त्यांनी केला.
हे पॅनेल बाणावलीच्या शिक्षण प्रणालीसाठी काम करेल. त्यासाठी बाणावलीच्या सर्व सेवानिवृत्त आणि सक्रिय शिक्षकांनी 9851134134 वर कॉल करून बाणावलीच्या शिक्षण जाहीरनाम्यात आपल्या सूचना कराव्या, असे आवाहन हॅन्झेल फर्नांडिस व व्हेंझी व्हिएगश यांनी केले आहे.