सीडीवर्कचे झाकण उघडे ठेवल्याने वाहतुकीला अडथळा, दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत रस्ते, सीडीवर्क आणि डेनेजचा विकास साधला जात आहे. तर दुसरीकडे दुर्दशा झालेल्या सीडीवर्क आणि ड्रेनेजमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. शेट्टी गल्ली येथील कॉर्नरवर असलेल्या सीडीवर्कचे झाकण मागील काही दिवसांपासून उघडे असल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.
मागील आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसामुळे सीडीवर्क आणि डेनेजची समस्या समोर आली आहे. पाण्याचा निचरा थांबल्याने डेनेजची झाकणे उघडी करण्यात आली आहेत. मात्र सीडीवर्कची स्वच्छता केल्यानंतर झाकणे झाकली गेली नाहीत. त्यामुळे येथील सीडीवर्क आणि डेनेजचे झाकण वाहतुकीला अडथळा ठरत आहे. या डेनेजच्या झाकणाजवळ बॅरिकेड ठेवण्यात आला असला तरी रात्रीच्यावेळी डेनेजचा खड्डा धोकादायक ठरत आहे. तर काही वेळेला वाहतुकीची कोंडीही या ठिकाणी होत आहे. त्यामुळे सीडीवर्कची दुरुस्ती करून डेनेज झाकण झाकावे, अशी मागणी होत आहे.