पुरुषांमाध्ये माणचा बाळू पुकळे तर महिलांमध्ये मनिषा जोशी प्रथम
प्रतिनिधी/ सातारा
निसर्गसंपन्न अशा सातारा शहरात कोरोनाच्या संकटानंतर सातारकर मनमुरादपणे जल्लोषी वातावरणात सातारा हाफ हिल मॅरेथॉनमध्ये धावले. खासदार उदयनराजेंच्या हस्ते स्पर्धेचा सकाळी फ्लॅग ऑफ करत मोठय़ा धुमधडाक्यात धावपट्टूंनी पळायला सुरुवात केली. हवेतला गारवा अन् देशभक्तीपर गीताची धुन, मॅरेथॉन मार्गावर चीअरअप करायला उभे असलेले सातारकर यामुळे धावपट्टूंना धावण्यांसाठी एक वेगळाच उत्साह संचारला होता. माण तालुक्यातील बाळू पुकळे यांनी 1 तास 14 मिनिट 13 सेकंदात अंतर पार करत सातारा हाफ हिल मॅरेथॉनवर माणदेशी मोहर उमटवली. तसेच महिलांमध्ये प्रथम येण्याचा मान मनिषा जोशी यांनी पटकावत अवघ्या 1 तास 46 मिनिट 35 सेकंदात अंतर पार केले. आजवरच्या मॅरेथॉनवर इथोपियाच्या धावपट्टूंनी कायम दबदबा ठेवला होता. पण यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या धावपट्टूंमध्ये स्पर्धा पूर्ण झाली.
कोरोनाच्या संकटानंतर सातारकरांची असलेली सातारा हाफ हिल मॅरेथॉन आयोजकांनी सर्व नियम पाळून घेतली होती. सकाळचे प्रसन्न असे वातावरणात पोलीस कवायत मैदानावर लाल, हिरव्या फुग्यांनी सजवले गेले होते. देशभक्तीपर गितांचे संगीत होते. सकाळी खासदार उदयनराजे यांचे स्वागत होताच त्यांच्या हस्ते स्पर्धेचा फ्लॅग ऑफ करुन स्पर्धेला सुरुवात झाली. धावपट्टू धावू लागले. धावपट्टूंचे चौकाचौकात स्वागत करण्यात येत होते. त्यामध्ये पोवई नाका, शाहु चौक, समर्थ मंदिर, बोगदा आदी ठिकाणी आयोजकांच्यावतीने व सातारकरांनी धावपट्टूंना टाळय़ा वाजवून प्रोत्साहित करण्यात येत होते. ही स्पर्धा पावणे दहा वाजता संपली. स्पर्धेत धावपट्टूंनी अंतर पार करण्यासाठी अगदी चढाओढ सुरु होती. आयोजकांच्यावतीने सर्व काळजी घेण्यात आली होती.
महिलांमध्ये प्रथम मनिषा जोशी तर पुरुषांमध्ये बाळू पुकळे
यावर्षी मोजकेच धावपट्टू बोलवण्यात आले होते. त्यामध्ये भारतीय महिलांमध्ये प्रथम क्रमांक मनिषा जोशी यांनी पटकावला. त्यांनी 1 तास 46 मिनिट 35 सेकंदात तर पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक बाळू पुकळे यांनी पटकावला असून त्यांनी 1 तास 13 मिनिट 13 सेकंदात अंतर पार केले अन् गोल्ड मेडल पटकावले.
वयोवृध्द महिलांचाही चांगला सहभाग
शरीराला धावणे हा चांगला व्यायाम असल्याने सातारा हाफ हिल मॅरेथॉनमध्ये वयोवृद्ध महिलांनी आवर्जून सहभाग घेतला होता. त्यामध्ये मॅरेथॉनचे सर्व अंतर पार करण्यात आले.