फ्रान्समधील जगप्रसिद्ध लक्झरी ग्रुप : सांगलीत ‘वालचंद’मध्ये झाले महाविद्यालयीन शिक्षण
वृत्तसंस्था / लंडन
जगभरातील मोठय़ा कंपन्यांमध्ये भारतीयांची गुणवत्ता उजळून निघाली आहे. पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ झाल्यावर आणखीन एक भारतीय लीना नायर यांना फ्रान्सचा लक्झरी ग्रुप ‘शनैल’ने स्वतःचा नवा ग्लोबल चीफ एक्झिक्यूटिव्ह (सीईओ) म्हणून नियुक्त केले आहे. लीना या मूळच्या कोल्हापूरच्या असून त्यांनी उच्च शिक्षण सांगलीतील महाविद्यालयात घेतलेले आहे. लीना नायर यापूर्वी युनिलिव्हरमध्ये चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या.
शनैल हा इंटरनॅशनल ब्रँड स्वतःचा ट्वीड सूट, क्विल्टेड हँडबॅग आणि नंबर 5 परफ्यूमसाठी ओळखला जातो. पुढील वर्षी जानेवारीत नायर या कंपनीत अधिकृतपणे सामील होणार आहेत. लीना यांनी मागील तीन दशकांमध्ये कंपनीत महत्त्वाचे योगदान दिले असल्याने त्यांचे आभार मानत असल्याचे उद्गार युनिलिव्हरचे सीईओ एलन जोप यांनी काढले आहेत.
कोल्हापूरमध्ये होते वास्तव्य
लीना नायर या मूळच्या कोल्हापुरातील आहेत. त्यांचे शालेय शिक्षण तेथील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले आहे. तर तर सांगलीत वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी जमशेदपूरच्या झेव्हियर्स स्कुल ऑफ मॅनेजमेंट (एक्सएलआरआय) मधून एमबीएची पदवी प्राप्त केली. लीना तेथील सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या होत्या.
मॅनेजमेंट ट्रेनीपासून प्रवास
लीना यांनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये 30 वर्षांपूर्वी मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कारकिर्दीस प्रारंभ केला होता. 2016 साली त्या कंपनीत सीएचआरओ पदापर्यंत पोहोचल्या. हिंदुस्थान लिव्हर कंपनीने पुढील काळात स्वतःचे नाव बदलून युनिलिव्हर केले होते. 52 वर्षीय लीना नायर 8 वर्षांपूर्वी 2013 मध्ये लंडनमध्ये स्थलांतरित झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी अँग्लो-डच कंपनीच्या लंडन मुख्यालयात लीडरशिफ आणि ऑर्गनायजेशन डेव्हलपमेंटच्या ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंटचे पद सांभाळले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्या पहिली महिला, पहिली आशियाई आणि सर्वात कमी वयाच्या सीएचआरओ ठरल्या होत्या. फॉर्च्युन इंडियाने मागील महिन्यातच सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत लीना यांना स्थान दिले होते.
सोशल मीडियावर मानले आभार
शनैलमध्ये सीईओ म्हणून काम करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. शनैल एक प्रतिष्ठि कंपनी आहे. युनिलिव्हरमध्ये काम केल्याचा गर्व मला कायम वाटत राहणार आहे. युनिलिव्हरमध्ये मला प्रचंड प्रेम आणि सन्मान मिळाला. सोशल मीडियावर प्रत्येकाची कॉमेंट वाचत असले तरीही प्रत्येकाला प्रतिसाद देऊ शकत नाही. परंतु या प्रेमासाठी तुम्हा सर्वांचे आभार असे लीना यांनी नमूद केले आहे.
शनैल मोठा समूह
फ्रान्सचा लक्झरी ग्रुप शनैलमध्ये आणखीन मोठे बदल झाले आहेत. प्रेंच अब्जाधीश एलेन वर्थाइमर हे ग्लोबल एक्झिक्यूटिव्ह चेअरमनची भूमिका बजावणार आहेत. एलेन हे बंधू जेरार्ड वर्थाइमर यांच्यासोबत शनैलचे मालक आहेत. शनैल या ग्रुपची स्थापना 1910 मध्ये फॅशन क्षेत्रातील दिग्गज गॅब्रिएल ‘कोको’ शनैल यांच्याकडून पॅरिसमध्ये रुए कँबोन येथे एक हॅट बुटीकच्या स्वरुपात करण्यात आली होती. पुढील काळात हा शब्द प्रेंच बडेजावाचे प्रतिक ठरला होता.