क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
जर्मनप्रीत सिंग आणि मिर्लन मुर्झाएव्हने केलेल्या गोलांच्या बळावर चेन्नईन एफसीने ओडिशा एफसीवर 2-1 गोलानी विजय मिळवून आयएसएल फुटबॉल स्पर्धेत शानदार विजय नोंदविला. वास्कोच्या टिळक मैदानावर काल हा सामना खेळविण्यात आला.
चेन्नईन एफसीने स्पर्धेतील आपला तिसरा विजय नोंदवून तिसऱया स्थानावर झेप घेतली. त्यांचे आता 6 सामन्यांतून तीन विजय व दोन बरोबरीने 11 गुण झाले आहे. ओडिशा एफसी संघाचा हा तिसरा पराभव. त्यांचे आता 6 सामन्यांतून 9 गुण झाले असून ते पाचव्या स्थानावर आहेत.
सामन्याच्या 23व्या मिनिटाला चेन्नईन एफसीच्या जर्मनप्रीत सिंग गोल केला. जर्मनप्रीतने मारलेला फटका अडविण्यात यत्न ओडिशा एफसीचा गोलरक्षक कमलजीत सिंगने केला, मात्र यात तो अपयशी ठरला. मध्यंतराला एक गोलची आघाडी असलेल्या चेन्नईन संघाने 63व्या मिनिटाला दुसरा गोल करून आघाडी वाढविली. हा गोल मिर्लन मुर्झाएव्हनने लालियानझुआला छांगटेच्या पासवर नोंदविला.
ओडिशा एफसीने शेवटच्या 20 मिनिटांत राखीव खेळाडूंना स्थान दिले. ताजा दमाच्या खेळाडूंमुळे सामन्यात रंगत वाढली आणि काही जोरदार आक्रमणेही केली तरी चेन्नईन संघाचा बचाव सर्वोत्कृष्ट राहिला. चेन्नईन 2-0 असा विजय मिळविणार असे वाटत असतानाच अतिरिक्त वेळेत झेवियर हर्नांडेझने गोल करून संघाची पिछाडी एक गोलने कमी केली.