क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
एफसी गोवाचा खेळाडू जॉर्गे ऑर्तिज याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या शिस्तपालन समितीने दोन सामन्यांसाठी निलंबित केले असून 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. एफसी गोवा आणि बेंगलोर यांच्यात 11 डिसेंबर रोजी झालेल्या लढतीत हिंसक वर्तन केल्याचा आरोप झाल्यानंतर गंभीर गैरवर्तन केल्याबद्दल ऑर्तिज दोषी आढळला.
शिस्तपालन समितीला दिलेल्या लेखी उत्तरात बेंगलोर एफसीचा खेळाडू सुरेश वांगजामला कोणतीही हानी करण्याचा हेतू नव्हता असे ऑर्तिजने सांगितले. 19 रोजी एआयएफएफच्या शिस्तपालन समितीने हा निकाल दिला.
ऑर्तिजने त्या सामन्यातील रेड कार्डमुळे एका सामन्याचे निलंबन त्याने आधीच भोगले आहे. 24 डिसेंबर रोजी एफसी गोवाचा सामना ओडिशा एफसी संघाशी होणार आहे. या सामन्यात त्याला खेळायला मिळणार नाही. 29 डिसेंबर रोजी होणाऱया एटीके मोहन बागानविरूद्धच्या लढतीसाठी तो निवडीसाठी पात्र असेल.