लुधियाना / वृत्तसंस्था
लुधियाना न्यायालयात झालेल्या स्फोटाचा तपास करणाऱया पोलिसांनी एका महिला कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. कमलजीत कौर नावाची ही महिला कॉन्स्टेबल बॉम्बस्फोटात ठार झालेल्या बडतर्फ कॉन्स्टेबल गगनदीप सिंगची मैत्रिण असल्याची माहिती तपास अधिकाऱयांनी दिली. ती सध्या खन्ना जिल्हा पोलीस मुख्यालयात सेवा बजावत होती. दरम्यान, स्फोटाचा तपास करणाऱया पथकाने शनिवारी दुपारी 3 वाजता लुधियाना न्यायालयात दोन ड्रग तस्करांना हजर केले. यामध्ये कुख्यात अंमली पदार्थ तस्कर रणजित सिंग उर्फ चिता आणि सुखविंदर सिंग यांचा समावेश आहे. लुधियाना तुरुंगात बंद असलेल्या या दोन्ही तस्करांना शनिवारी सकाळीच प्रोडक्शन वॉरंटवर तपास पथकाने ताब्यात घेतले. आता दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्फोटादरम्यान ठार झालेल्या गगनदीपला 2019 मध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती. पोलीस खात्यातील त्यांच्या 8 वर्षांच्या सेवेदरम्यान, गगनदीप सिंग खन्ना येथील एसपी मुख्यालयात सेवेत होता. याचदरम्यान कॉन्स्टेबल कमलजीत कौरशी त्याची मैत्री झाली होती. ड्रग्ज प्रकरणात पकडल्यानंतर 2 वर्षे तुरुंगवास भोगून 8 सप्टेंबर 2021 रोजी तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. तेव्हापासून तो लेडी कॉन्स्टेबल कमलजीत कौरच्या संपर्कात होता. पंजाबचे डीजीपी सिद्धार्थ चटोपाध्याय यांनी लेडी कॉन्स्टेबलच्या ताब्यात घेतल्याची पुष्टी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.