रक्षक माजी सैनिक सेवा संघटनेतर्फे उपक्रम : देशाभिमान जागविण्यासाठी धडपड : मुलांच्या शारीरिक-मानसिक तंदुरुस्तीवर भर
युवराज पाटील /सांबरा
सध्याची युवा पिढी मोबाईल व टीव्हीच्या पूर्णपणे आहारी गेली आहे. शारीरिक खेळ खेळण्याकडे मुलांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मुले एक प्रकारे मानसिक तणावाखाली वावरत आहेत. मुलांना मोबाईलपासून दूर करून त्यांना शारीरिक खेळांची सवय लावण्यासाठी तसेच त्यांच्यात देशाभिमान जागवून सैन्यात भरती करण्यासाठी सांबरा येथील रक्षक माजी सैनिक सेवा संघटना धडपडत आहे.
विशेष म्हणजे दोन महिन्यांपासून ते लहान मुले ते महाविद्यालयीन मुलांपर्यंत सर्वांना विनाशुल्क प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे येथे येणाऱया मुलांची दिवसेंदिवस संख्या वाढू लागली आहे. मुलांनी आपले ध्येय निश्चित केले असेल व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गुरू भेटत असेल तर नक्कीच जीवनात मुलांना यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
देशसेवा करून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांचा या संघटनेमध्ये समावेश आहे. या संघटनेमार्फत नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. आता या संघटनेने मुलांना शारीरिक व मानसिकरीत्या तंदुरुस्त बनविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार दोन महिन्यांपासून ही संघटना कार्य करत आहे.
खेळाला प्रोत्साहन
येथे दररोज मुलांना विविध शारीरिक खेळ खेळण्यास दिले जातात. कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, धावणे यासह इतर खेळ जे मुलांना खेळायला आवडतात. महाविद्यालयीन मुलांना सैन्यात भरती होण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले जाते. त्यादृष्टीने त्यांना मोफत प्रशिक्षणही दिले जात आहे.
येथे दर रविवारी विविध स्पर्धा भरविल्या जातात. त्यांना विविध बक्षिसे देऊन प्रोत्साहन दिले जाते. सायंकाळच्या वेळी दररोज सायकलिंग घेतली जाते. तसेच मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच कोचिंग क्लासदेखील चालू करण्यात येणार आहेत. सध्या अनेक मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने दहावीनंतर नेमके काय करायचे? हे सुचत नसल्याने ते जीवनात यशस्वी होऊ शकत नाहीत. मात्र, मुलांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केल्यास ते जीवनात नक्कीच यशस्वी होतील आणि याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे रक्षक माजी सैनिक सेवा संघटना होय.
संघटनेत सर्व माजी सैनिक
या संघटनेत अध्यक्ष म्हणून निवृत्त सुभेदार मेजर लक्ष्मण खवासपूर आहेत. उपाध्यक्ष जोतिबा चव्हाण, सेपेटरी प्रदीप तिप्पाण्णाचे, संचालक लक्ष्मण जयस्वार, यल्लाप्पा पाटील, बाबू जोगाणी, यल्लाप्पा मोदेकर, कल्लाप्पा बकरे, अर्जुन जाधव, एम. संगमन्नावर, नितीन चिंगळे, मुत्तान्ना कत्राळ, भुजगौडा पाटील या माजी सैनिकांचा समावेश आहे.
ग्रा.पं.ने जागा उपलब्ध केल्यास सोयीस्कर
सध्या संघटनेमार्फत मुलांना देण्यात येणारे प्रशिक्षण हे येत्या काळात त्यांना फार उपयोगी पडणार आहे. त्यांना शारीरिक व मानसिकरीत्या सुदृढ बनवून सैनिक बनण्यासाठी हे प्रशिक्षण गरजेचे आहे. संघटनेतील सर्वजण आपापल्यापरीने मुलांना प्रशिक्षण देत आहेत. मात्र, प्रशिक्षण देण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्यास मुलांना प्रशिक्षण देणे सोईस्कर होऊ शकते.
– लक्ष्मण खवासपूर
मुलांना योद्धा बनविण्याचा उद्देश
आमच्या संघटनेमार्फत येथे दररोज तीनश-चारशे मुलांना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या मोबाईल व टीव्हीच्या आहारी मुले गेली आहेत. त्यामुळे मुलांना यापासून दूर ठेवून त्यांचे शारीरिक व मानसिक मनोबल वाढविण्यासाठी आमची संघटना धडपडत आहे. मुलांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना योद्धा बनविण्यासाठी आमच्या संघटनेचा उद्देश आहे.
– प्रदीप तिप्पाण्णाचे (सेपेटरी)
योग्य मार्गदर्शनाचा लाभ
आम्ही येथे गेल्या दोन महिन्यांपासून संघटनेकडून दिले जाणारे प्रशिक्षण घेत आहोत. येथे आम्हाला योग्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. दररोज वेगवेगळे खेळ खेळविले जातात. सैन्यासह इतर भरतीसाठी आम्हाला योग्य मार्गदर्शन केले जात आहे. सर्व गुरुजन आपल्या मुलांप्रमाणे येथे आम्हाला प्रशिक्षण देत आहेत.
– स्वाती देसाई (सांबरा)
सैन्यात भरतीसाठी प्रशिक्षण उपयुक्त
येथे आम्हाला भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे. जे सैन्यात भरती होण्यासाठी आम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सैन्य भरतीसाठी जी शारीरिक क्षमता लागणार आहे त्या पद्धतीने आम्हाला घडविले जात आहे. त्यामुळे येथील प्रशिक्षण आम्हाला अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
– सचिन देसाई (सांबरा)