जेरूसलेम
कोरोनाच्या ओमिक्रोन या नव्या व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातला असून इस्त्रायल देशही यातून सुटलेला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये इस्त्रायल देशामध्येही ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून याची दखल घेत देशाने कोरोनाप्रतिबंधक चौथा लसीचा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे चौथा डोस देणारा हा पहिलाच देश असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 2020 मध्ये या देशाने कोरोना लसीकरणाच्या बाबतीमध्ये वेगवान प्रक्रिया राबवून सर्वच देशांना पाठीमागे टाकले होते. सध्याला वैयक्तिक पातळीवर ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे अशांना व आरोग्य कर्मचाऱयांना देशाने कोरोना प्रतिबंधक लसीचा चौथा डोस देण्याचे नियोजन केले आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी इस्त्रायलमधील शेबा मेडिकल सेंटरमध्ये झाला आहे. ज्या ठिकाणी हृदयरोग व फुफ्फुसाच्या विकाराच्या रुग्णांना चौथा डोस दिला गेला आहे. गुरुवारी इस्रायलमध्ये 4 हजारहून अधिक रुग्ण सापडल्याने देशापुढे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारी म्हणून देशामध्ये विविध निर्बंध लावण्याची योजना आखली जात आहे.