नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पोल व्हॉल्टमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी राजस्थानमधील भिलवाडा जिल्हय़ातून राजधानीत आलेल्या देवराज सिंगला सध्या मात्र आर्थिक अडचणींशी झुंजावे लागत असून याचमुळे त्याच्यावर आता दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीत रात्रपाळीत सिक्युरिटी गार्ड म्हणून सेवा बजावण्याची वेळ आली आहे.
‘माझ्या पालकांनी मला सरावासाठी, आवश्यक क्रीडा साहित्यासाठी पैसे देण्यास नकार दिला आणि त्यानंतर अचानक कोव्हिड-19 मुळे लॉकडाऊन लागू झाले. पोल व्हॉल्टमध्ये ऑलिम्पिक गाजवायचे, हे माझे लक्ष्य आहे. पण, सरावासाठी पैसाच हाताशी नसल्याने मला आता रात्रपाळीत काम करावे लागत आहे’, असे देवराज याप्रसंगी म्हणाला.
‘मी काही स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. मात्र, सारे खर्च सांभाळून सराव करणे, डाएटवर भर देणे अजिबात शक्य होत नाही. अनेक अडचणी आहेत आणि यामुळे मला पुरेसा सराव करणे जमत नाही. आता रात्रपाळीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहे. पण, रात्रपाळीमुळे झोप होत नाही. तरीही यातून मार्ग काढत मी जमेल त्याप्रमाणे तयारी करत आहे’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
‘जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर आता पोल व्हॉल्ट होत नाही. पोल व्हॉल्टसाठी उत्तम दर्जाचे शूज असावे लागतात. अन्यथा दुखापत होण्याची भीती असते. पोल व्हॉल्ट मुळातच महागडा खेळ आहे. सध्या माझ्याकडे स्वतःचा पोल आहे. मला देशातर्फे उत्तम योगदान द्यायचे आहे. पण, सरावासाठी सुविधांची वानवा आहे. सरकारकडून काहीही उत्तर येत नाही, ही व्यथा आहे. पोल व्हॉल्टमध्ये आजवर भारताच्या एकाही खेळाडूला ऑलिम्पिक प्रतिनिधीत्व करता आलेले नाही. ती कसर भरुन काढण्याचे माझे लक्ष्य आहे. पण, जवाहरलाल स्टेडियमवर लँडिंगसाठी पिट देखील उपलब्ध नाही’, याचा देवराजने येथे उल्लेख केला.
दिल्लीतील एका खोलीत सारी गुजराण
देवराजच्या कमाईतील बराच वाटा त्याने दिल्लीत अन्य एका ऍथलिटसह घेतलेल्या सिंगल रुमचे भाडे भागवण्यात खर्च होतो. त्यात जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर सरावाची सुविधा नसल्याने त्याला सरावासाठी फरिदाबादला जावे लागते. 23 वर्षीय देवराज आता दि. 4 ते 7 जानेवारी या कालावधीत मंगळूरनजीक मुडबिद्री येथे होणाऱया 81 व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार आहे. मात्र, यासाठीही पुरेसा सराव झाला नसल्याचे त्याने नमूद केले.