अवतार सिंह भडानांचा रालोदमध्ये प्रवेश
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला झटका बसण्याचे सत्र सुरूच आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर भाजपला आणखीन काही झटके बसले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि विद्यमान आमदाराने पक्षाला रामराम ठोकला आहे. माजी खासदार अवतार सिंह भडाना यांनी जयंत चौधरींच्या राष्ट्रीय लोकदलात प्रवेश केला आहे. तर राज्यातील वनमंत्री दारा सिंह चौहान यांनी राजीनामा दिला आहे.
रालोद प्रमुख जयंत चौधरी यांनी भडाना यांच्या पक्षप्रवेशाची माहिती ट्विट करत दिली आहे. बुधवारी सकाळी रालोद प्रमुखांनी अवतार सिंह भडाना यांचे पक्षात स्वागत केले. भडाना हे मुजफ्फरनगरच्या मीरपूरचे आमदार आहेत. परंतु 2019 ची लोकसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढविली होती, ज्यात त्यांना पराभूत व्हावे लागले होते. पण त्यांनी विधनासभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता. यामुळे भडाना यांना भाजपचे आमदार म्हणूनच गणले जात होते.
2019 लोकसभा निवडणुकीनंतरच त्यांनी भाजप सोडण्याची तयारी सुरू केली होती. यंदाची विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढविण्याची त्यांची योजना होती. परंतु त्यांनी आता रालोदमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसलाही झटका बसला आहे. भडाना हे चारवेळा खासदार राहिले आहेत.