तेलंगणातील दुर्घटनेत कोटय़वधींची हानी : पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
हैदराबाद / वृत्तसंस्था
तेलंगणातील ऐतिहासिक वास्तू म्हणून परिचित असलेल्या सिकंदराबाद क्लबमध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार या दुर्घटनेत सुमारे 20 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तासाभराच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्मयात आणली. आगीमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे. 1878 मध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेला, सिकंदराबाद क्लब हा भारतातील सर्वात जुन्या क्लबपैकी एक आहे. 22 एकर जागेत सिकंदराबाद क्लब विस्तारलेला असून हैदराबाद शहरी विकास प्राधिकरणाने त्याला ‘हेरिटेज’चा दर्जा दिलेला आहे.
मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास क्लबमधील लाकडी वास्तूला आग लागली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांना यासंबंधी माहिती देण्यात आली. पेट्रोलिंग डय़ुटी करणाऱया पोलिसांना आग लागल्याचे दिसताच ते घटनास्थळी पोहोचले. तसेच अग्निशमन दलाच्या आठ गाडय़ाही तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग आटोक्मयात आणण्यासाठी काही तास लागले. आग लागलेली वास्तू 60,000 चौरस फुटांमध्ये पसरलेली असून ती तीनमजली इमारत आहे. प्राथमिक माहितीनुसार, आग पहिल्या मजल्यावर लागली आणि लगेचच उर्वरित मजल्यांवर पसरली. क्लबचे प्रशासकीय विभाग पहिल्या मजल्यावर आहेत. मुख्य इमारतीमध्ये रिसेप्शन, डायनिंग, बॉल रुम आणि स्वयंपाकघरही आहे. हेरिटेज इमारतीमध्ये मोठय़ा प्रमाणात लाकडाचा वापर असल्याने आग झपाटय़ाने पसरल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.