साधारण 0.9 टक्क्यांनी वृद्धी राहणार असल्याची कंपनीची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा मोर्ट्स आपल्या प्रवासी वाहनांच्या किमती 19 जानेवारी(आजपासून) पासून साधारण 0.9 टक्क्यांनी वाढवणार असल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली आहे. अशा रितीने काही स्वरुपात खर्चाचा भार हलका करण्याचा प्रयत्न कंपनीकडून होणार आहे.
देशातील बाजारात टियागो, पंच आणि हॅरियर यासारख्या विविध मॉडेलची विक्री टाटा मोटर्सकडून केली जाते. टाटा मोटर्सने दिलेल्या एका माहितीनुसार 19 जानेवारी 2022 मध्ये विविध मॉडेल्सच्या किमती वाढविणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
कंपनीने ग्राहकांच्या प्रतिक्रियाच्या आधारे म्हटले आहे, की एका विशिष्ट मॉडेलच्या किमतीमध्ये 10,000 रुपयापर्यंत कपात केली आहे. पण दुसरीकडे आता निर्मितीसाठी येणाऱया खर्चात वाढ होत असून त्यानुसारच मॉडेलच्या किंमती त्या त्या प्रमाणात वाढवल्या गेल्या असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीला खर्च एकदम येत असला तरी ग्राहकांवर तो कमी प्रमाणात लादला जातो, असे कंपनीने म्हटले आहे. खर्चाचा वाढता बोजा कमी करण्यासाठी किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे टाटाने म्हटले आहे.
मारुतीने वाढवल्या किंमती
या अगोदर मारुती सुझुकी इंडियाने मागील आठवडय़ात आपल्या विविध प्रकारातील वाहनांच्या किमती 4.3 टक्क्यांपर्यंत वाढविल्या आहेत. मारुती सुझुकीनेही उत्पादन खर्चात वाढ झाल्याच्या कारणास्तव किंमती वाढवल्या असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. सर्व प्रकारच्या मॉडेलवरच्या किंमती या 0.1 ते 4.3 टक्के वाढल्या आहेत.