ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम : निक किर्गीओस, अँडी मरे, गार्बिन मुगुरुझा, एम्मा रॅडुकानू, ऍनेट कोन्टावेट, स्टोसुर यांचे आव्हान संपुष्टात
वृत्तसंस्था /मेलबर्न
जागतिक द्वितीय मानांकित डॅनील मेदवेदेव्हने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओसचे आव्हान संपुष्टात आणत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला. याशिवाय ग्रीसचा स्टेफानोस सित्सिपस, महिलांमध्ये क्लारा टॉसन, आर्यना साबालेन्का, ऍलिझ कॉर्नेट यांनी एकेरीची तिसरी फेरी गाठली तर अँडी मरे, गार्बिन मुगुरुझा, अमेरिकन ओपन चॅम्पियन एम्मा रॅडुकानू, ऍनेट कोन्टावेट यांचे आव्हान संपुष्टात आले.
पुरुष एकेरीत रशियाच्या मेदवेदेव्हने किर्गीओसवर 7-6 (7-1), 6-4, 4-6, 6-2 अशी मात केली. या सामन्याला 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांनी किर्गीओसला त्याच्या प्रत्येक फटक्यावर प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला मेदवेदेव्हवर मात करणे शक्य झाले नाही. त्याची पुढील लढत 57 व्या मानांकित नेदरलँड्सच्या बोटिक व्हान डी झांडस्कल्पशी होणार आहे. ग्रीसच्या सित्सिपसने तिसरी फेरी गाठण्यात कसेबसे यश मिळविले. त्याला अर्जेन्टिनाच्या सेबॅस्टियन बाएझने विजयासाठी झगडण्यास भाग पाडले. सित्सिपसने 3 तास 22 मिनिटे चाललेल्या या लढतीत बाएझवर 7-6 (7-1), 6-7 (5-7), 6-3, 6-4 अशी मात करीत आगेकूच केली.
अँडी मरे पराभूत
पाच वर्षात पहिला विजय मिळविणाऱया ब्रिटनच्या अँडी मरेचे आव्हान दुसऱया फेरीत संपुष्टात आले. त्याला 120 व्या मानांकित टॅरो डॅनियलने 6-4, 6-4, 6-4 असे हरविले. या दोघांची यापूर्वी डेव्हिस चषक स्पर्धेत गाठ पडली होती. त्यावेळी मरेने जपानच्या डॅनियलविरुद्ध विजय मिळविताना फक्त दोन गेम्स गमविले होते. 91 पेक्षा खालच्या क्रमांकावर असणाऱया एकाही खेळाडूंकडून यापूर्वी मरे पराभूत झाला नव्हता. मरेने पाचवेळा येथील स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले आहे.
महिला एकेरीत आर्यना साबालेन्काला तिसरी फेरी गाठताना विजयासाठी तीन सेट्सचा संघर्ष करावा लागला. तिने चीनच्या वांग झिनयूवर 1-6, 6-4, 6-1 अशी मात केली. पहिला सेट गमविताना साबालेन्काने 12 डबल फॉल्ट केले होते. पण लय सापडल्यानंतर तिने 100 व्या मानांकित प्रतिस्पर्धीला मात करण्यात यश मिळविले.
रॅडुकानू, कोन्टावेट, मुगुरुझा स्पर्धेबाहेर
अमेरिकन ओपन चॅम्पियन एम्मा रॅडुकानूला या स्पर्धेच्या दुसऱया फेरीतूनच स्पर्धेबाहेर पडावे लागले. 19 वर्षीय रॅडुकानूने या स्पर्धेत प्रथमच भाग घेतला होता. माँटेनेग्रोच्या डंका कोविनिकवर तिने 3-0 अशी आघाडी घेतली तेव्हा ही लढत तीच जिंकणार असे वाटले होते. पण 17 वे मानांकन मिळालेल्या रॅडुकानूने नंतर सलग पाच गेम्स गमविल्यानंतर तिने उजव्या मनगटावर उपचार करून घेण्यासाठी टाईमआऊट घेतले. पण कोविनिकला ती 6-4, 4-6, 6-3 असा विजय मिळविण्यापासून रोखू शकली नाही. कोविनिकची पुढील लढत सिमोना हॅलेप किंवा बियाट्रिझ हदाद माया यापैकी एकीशी होईल. इस्टोनियाच्या सहाव्या मानांकित ऍनेट कोन्टावेटलाही या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. तिला डेन्मार्कची 19 वर्षीय खेळाडू क्लारा टॉसनने 6-2, 6-4 असे हरविले. टॉसनची लढत 27 व्या मानांकित डॅनियली कॉलिन्सशी होईल. कॉलिन्सने ऍना कोन्जुहचा 6-4, 6-3 असा पराभव केला. अन्य सामन्यात रशियाच्या ऍनास्तेशिया पावल्युचेन्कोव्हाने ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसुरचा 6-2, 6-2 असा पराभव केला. स्टोसुरचा हा कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. द्वितीय मानांकित गार्बिन मुगुरुझाचे आव्हानही दुसऱया फेरीतच संपुष्टात आले. तिला ऍलिझ कॉर्नेटने 6-3, 6-3 असे हरवित तिसरी फेरी गाठली.
सानिया मिर्झा-राजीव राम दुसऱया फेरीत
भारताची सानिया मिर्झा व अमेरिकन साथीदार राजीव राम यांनी मिश्र दुहेरीची दुसरी फेरी गाठताना सर्बियाच्या अलेक्सांड्रा प्रुनिक-निकोला कॅसिक यांच्यावर 6-3, 7-6 (7-3) अशी मात केली. सानियाची ही शेवटची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा असून या वर्षअखेरीस निवृत्त होणार असल्याचे तिने महिला दुहेरीची पहिली लढत गमविल्यानंतर जाहीर केले आहे. पहिला सेट सानिया-राजीव यांनी सहज घेतल्यानंतर दुसऱया सेटमध्ये त्यांना संघर्ष करावा लागला. दोन्ही जोडय़ांनी उत्तम सर्व्हिस केली आणि एकमेकांना ब्रेक घेण्यापासून दूर ठेवले. त्यामुळे हा सेट टायब्रेकरवर गेला. टायब्रेकरमध्ये सानिया-राम यांनी 7-1 अशी बाजी मारत सामना जिंकला.