उमेदवारी मिळण्याची शक्यता, डॉ. प्रमोद सावंत यांचा लोबोंवर हल्लाबोल
प्रतिनिधी/ पणजी
कळंगूचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्यांना आता भाजपची तेथील उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आणि कळंगूटमध्ये भाजपचा उमेदवार विजयी होणार असल्याची खात्री वर्तविली.
पणजीतील भाजपच्या प्रचार कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. त्यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार ग्लेन टिकलो व भाजपचे इतर नेते उपस्थित होते. भाजपचे उपरणे गळय़ात घालून व पुष्पगुच्छ देऊन सिक्वेरा यांना सदस्यत्वाची पावती सादर करून प्रवेश देण्यात आला.
डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यावेळी माजी मंत्री मायकल लोबो यांच्यावर हल्लाबोल केला. प्रथम देश व नंतर बाकीचे हे भाजपचे तत्व आहे. परंतु प्रथम पत्नी व नंतर बाकीचे हे लोबोंचे तत्व असून ते भाजपला मान्य नाही म्हणून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. आता शिवोलीत त्यांच्या पत्नीला आणि कळंगूटमध्ये लोबो यांना मतदाराच धडा शिकवतील व त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असे डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
गुदिन्हो यांनी सांगितले की, लोबो हे कचरामंत्री होते. ते स्वतः कचरा होते हेच आता दिसून आले असून हा कचरा भाजपमधून दूर झाला आहे. आता त्यांचा पुढे कचरा होणारच असल्याची टीका गुदिन्हो यांनी केली. पर्रीकरांच्या सांगण्यावरून आम्ही त्यावेळी लोबोंसाठी काम केले आणि त्यांना निवडून आणले. आता मात्र त्यांनी घुमजाव केले व भाजपचा विश्वासघात केला असा आरोप सिक्वेरा यांनी केला आहे. त्यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल असेही सिक्वेरा म्हणाले. शिवोलीचे भाजप उमेदवार दयानंद मांद्रेकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष दिलीप परुळेकर, कळंगूट भाजप मंडळ अध्यक्ष गुरुदास शिरोडकर व इतर उपस्थित होते.