दोन पोलीस अधिकाऱयांची विशिष्ट सेवा पदकासाठी निवड
प्रतिनिधी/ बेंगळूर
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्तम सेवा बजावलेल्या पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. यंदा कर्नाटकातील 21 पोलिसांची राष्ट्रपती पदकासाठी निवड झाली आहे.
राज्य गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बी. दयानंद आणि गुन्हे आणि तांत्रिक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. हितेंद्र या दोन पोलीस अधिकाऱयांना विशेष कामगिरीबद्दल विशिष्ट सेवा पदक घोषित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहखात्याने देशभरातून 88 पोलीस अधिकाऱयांना विशिष्ट सेवेकरिता तर 939 पोलिसांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर केले आहे.
राज्यातून 19 पोलिसांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक घोषित झाले आहे. बेंगळूर रहदारी विभागाचे पोलीस आयुक्त बी. आर. रविकांतेगौडा, केएसआरपीच्या 5 व्या बटालियनचे कमांडंट रामय्या जनार्दन, बेंगळूरच्या हलसूर उपविभागाचे पोलीस उपायुक्त डी. कुमार, हुणसूर उपविभागाचे डीएसपी प्रभूदेव रवीप्रसाद, सिंधनूरचे डीएसपी वेंकटप्पा नायक ओलेकार, आनेकल उपविभागाचे डीएसपी एम. मल्लेशय्या, सीआयडीच्या सायबर गुन्हे विभागाचे डीएसपी यशवंतकुमार, गुलबर्गा सीसीआरबीचे पोलीस उपायुक्त गंगाधर मठपती, कर्नाटक लोकायुक्तचे डीएसपी के. एम. रमेश, सीआयडीचे डीएसपी एस. बी. केंपय्या, लोकायुक्तचे पोलीस निरीक्षक एस. कृष्णमूर्ती, बेंगळूरच्या केएसआरपी बटालियन 1 चे सी. आर. सिंपी, बेळगाव डीएआरचे एआरएसआय आय. मोहम्मद हनिफ, बेळगाव खडेबाजार पोलीस स्थानकातील शंकर शिंदे, बेंगळूरमधील सीपी कार्यालयातील एएसआय एम. एच. रेवण्णा यांना देखील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.