वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या आगामी होणाऱया पुरुषांच्या टी-20 विश्वचषक पात्रता अ स्पर्धा ओमानमध्ये 18 फेब्रुवारीपासून खेळविली जाणार आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना ओमान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे.
आयसीसी पुरुषांच्या टी-20 विश्वचषक अ गट पात्र फेरी स्पर्धेत यजमान ओमान, बहरीन, कॅनडा, जर्मनी, आयर्लंड, नेपाळ, फिलिपाईन्स, संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत बाद झाल्यानंतर आयर्लंड आणि ओमान हे दोन संघ या पात्र फेरी स्पर्धेसाठी पुन्हा पात्र ठरविण्यात आले आहेत. पुरुषांच्या टी-20 सांघिक मानांकनाच्या आधारे नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरात या दोन संघांनी या पात्र फेरी स्पर्धेत स्थान मिळविले आहे. गेल्या वषी विविध विभागीय पात्र फेरी स्पर्धेतून इतर संघ ओमानमधील स्पर्धेत दाखल झाले आहेत.
18 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया अ गटातील पात्र फेरी स्पर्धेतील संघ दोन गटात विभागण्यात आले आहेत. प्रत्येक संघ दुसऱया संघाबरोबर एकदा लढत देईल. या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळवणारे दोन्ही संघ चालू वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱया 2022 च्या आयसीसी पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भाग घेतील. ओमानमधील खेळविल्या जाणाऱया स्पर्धेत अ गटात कॅनडा, नेपाळ, ओमान, फिलिपाईन्स तर ब गटात बहरीन, जर्मनी, आयर्लंड आणि संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पुरुषांच्या टी-20 विश्वचषक ब पात्र फेरीची स्पर्धा 11 ते 17 जुलै दरम्यान हरारेमध्ये आयोजित केली आहे. या स्पर्धेत यजमान झिम्बाब्वे, हाँगकाँग, जर्सी, हॉलंड, पापुआ न्यू गिनिया, सिंगापूर, युगांडा, अमेरिका यांचा समावेश आहे.