प्रथम मुस्लीम मग भारतीय असे वक्तव्य करणारा नेता
मी प्रथम मुस्लीम आहे, मग त्यानंतर भारतीय, कुणी आमच्यावर बळजबरी करू शकत नाही अशाप्रकारच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे माजी आमदार माविया अली यांनी सहारनपूर जिल्ह्य़ातील देवबंद मतदारसंघातून दावेदारी केली आहे. त्यांच्यामुळे समाजवादी पक्षात खळबळ उडाली आहे. या मतदारसंघातून सपचे दोन दावेदार कार्तिकेय राणा आणि माविया अली निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर मुजफ्फरनगरमध्ये सपचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कार्तिकेय राणा हेच देवबंदमधील अधिकृत उमेदवार असल्याची घोषणा केली आहे.
तत्पूर्वी माविया अली यांनी स्वतःला सपचा अधिकृत उमेदवार ठरविले होते. परंतु अखिलेश यांच्या घोषणेनंतर सप उमेदवारासंबंधी स्थिती स्पष्ट झाली आहे. परंतु माविया अली यांच्या पुढील राजकीय पावलाकडे आता लोकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
कोण आहेत माविया अली?
माजी आमदार माविया अली कधीकाळी माजी मंत्री दिवंगत राजेंद्र राणा यांचे निकटवर्तीय मानले जायचे. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत देवबंदमध्ये नगरसेवक असताना अली यांनी राणा यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यानंतर नगरपालिका निवडणुकीत विजयी होत अली हे नगराध्यक्ष झाले होते.
सपला सोडचिठ्ठी, काँग्रेसकडून आमदार
याचदरम्यान राजेंद्र राणा आजारी पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. 2016 मध्ये देवबंदमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक झाली, यात समाजवादी पक्षाने राजेंद्र राणा यांच्या पत्नी मीना राणा यांना उमेदवारी दिली. परंतु माविया अली यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणूक लढविली आणि विजय देखील मिळविला होता.
वादग्रस्त पार्श्वभूमी
2017 उत्तरप्रदेश निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडी झाल्यावर देवबंद मतदारसंघ सपच्या वाटय़ाला आला. त्यानंतर माविया यांनी पुन्हा एकदा समाजवादी पक्षात प्रवेश करत निवडणूक लढविली. 2017 च्या निवडणुकीत भाजपचे कुंवर बृजेश सिंह देवबंदमध्ये विजयी झाले हेते. योगी सरकारने स्वातंत्र्यदिनी सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत गायन व्हावे आणि त्याचे चित्रिकरण करावे असा आदेश काढला होता. यावर माविया अली यांनी मी प्रथम मुस्लीम आहे, मग भारतीय, आमच्यावर कुणीच बळजबरी करू शकत नसल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानावर मोठा वाद झाला होता.
राजकीय नाटय़
3 दिवसांपूर्वी कार्तिकेय राणा यांनी सप उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार इम्रान मसूद देखील होते. तर माविया अली यांनी सप प्रदेश उपाध्यक्ष आणि स्टार प्रचारक जगपाल दास गुर्जर तसेच अन्य नेत्यांसोबत जात अर्ज दाखल केला होता. समाजवादी पक्षाच्या चिन्हावर अली यांनी देवबंदमधून अर्ज भरल्यावर राजकीय वातावरण तापले होते.