अनोख्या समुदायाची अत्यंत विचित्र प्रथा
इंडोनेशियाच्या एका समुदायात एक अशी प्रथा प्रचलित आहे, ज्याबद्दल समजल्यावर अंगावर काटा येतो. या समुदायाच्या महिला स्वतःच्या प्रियजनांच्या मृत्यूनंतर स्वतःची बोटं कापून घेतात. इंडोनेशियातील एका समुदायाच्या महिलांकडून हा प्रकार केला जातो. जगभरातील विविध समुदायांमध्ये महिलांना अनेक प्रकारच्या समस्या आणि प्रथांच्या नावावर अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु ही प्रथा त्या सर्वांपेक्षा अत्यंत विचित्र आणि वेगळी आहे.
इंडोनेशियाच्या डानी समुदायामध्ये प्रियजनांच्या मृत्यूनंतर महिलांची बोटं कापण्याची प्रथा आहे. या प्रथेला इकिपालिन म्हटले जाते.
सरकारकडून बंदी
इंडोनेशियाच्या जयाविजया प्रांताच्या वामिन शहरात डानी समुदायाचे लोक मोठय़ा संख्येत राहतात. या आदिवासी समुदायातील इकिपालिन प्रथेवर इंडोनेशियाच्या सरकारने अनेक वर्षांपूर्वी बंदी घातली होती. परंतु वृद्ध महिलांची बोटं पाहून त्या याचे पालन करत असल्याचे दिसून येते. या भागात या प्रथेचे पालन अद्याप सुरू असल्याचे मानले जाते.
प्रथेमागील कारण
जेव्हा कोणी मरतो, तेव्हा त्याच्या आत्म्याला शांतता मिळावी म्हणून कुटुंबातील महिला स्वतःची बोटं कापून घेतात असे या समुदायाचे मानणे आहे. याचबरोबर बोटं कापून घेतल्यावर त्याच्या वेदना या मृत्युमुखी पडलेल्याच्या वेदनेसमोर काहीच नसल्याचे दर्शवते. बोटांचा वरील हिस्सा कापण्यासाठी दगडाने तयार ब्लेडचा सर्वसाधारणपणे वापर केला जातो. काही प्रकरणांमध्ये ब्लेडशिवायच बोट कापले जाते. लोक बोट चावतात आणि मग मधून दोराने घट्ट आवळून धरतात, यामुळे रक्तप्रवाह थांबतो. दोराने बांधल्यावर रक्त आणि ऑक्सिजन कमी झाल्यावर बोट आपोआप तुटून पडते. कापलेले बोट जमिनीत गाडतात किंवा जाळले जाते.